सिंहस्थ 2027 : नाशिकमध्ये रेल्वेचा मेगा प्लॅन; रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

नाशिक । नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर रेल्वे पायाभूत सुविधांच्या उभारणीचा आराखडा तयार केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबतची सविस्तर बैठक घेत नाशिक, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील कामांचा आढावा घेतला.

या कामांसाठी एकूण 1,011 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील दोन वर्षांत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सिंहस्थ मेळ्यादरम्यान तीन कोटीहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने, प्रवासी सुविधा, वाहतूक नियंत्रण आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था यावर विशेष भर दिला जात आहे.

प्रयागराज महाकुंभ 2025 मधील यशस्वी पद्धतींचा अभ्यास करून, त्याच धर्तीवर नाशिकसाठी योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी पर्याप्त स्टेबलिंग क्षमतेची आवश्यकता अधोरेखित करत, स्थानकांवरील सुविधांचा दर्जा वाढवण्यावर भर दिला आहे.

असा होणार विकास
नाशिक रोड
फलाट ४ द्विदिशात्मक
फलाट १ चा २४ डब्यांसाठी विस्तार
१२ मीटर रुंदीचा एफओबी
स्टेबलिंग लाईन्स, यार्ड, टॉवरचे अद्ययावतीकरण
प्रगत कोच तपासणी केंद्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

ओढा
लूप लाईन्ससह आयलंड फलाट
६ मीटर रुंदीचे ४ ओव्हर ब्रिज
५ स्टेबलिंग लाईन्स, यार्ड पुनर्रचना

खेरवाडी
नवीन डाउन फलाट
२ ओव्हर ब्रिज
यार्ड पुनर्रचना

कसबे सुकेणे
फलाटांचा विस्तार
डिस्पॅच सुविधा
२ ओव्हर ब्रिज

देवळाली
प्रवासी सुविधांचे आधुनिकीकरण

प्रत्येक स्थानकावरअशा असतील सुविधा
छप्परयुक्त फलाट
पाण्याच्या टाक्या
आधुनिक स्वच्छतागृह
जलरोधक होल्डिंग एरिया
सर्क्युलेटिंग एरिया
प्रवेश व निर्गमन रस्ते
प्रवासी माहिती प्रणाली

विशेष गाड्यांची व्यवस्था
सिंहस्थ 2027 मध्ये येणार्‍या 3 कोटी यात्रेकरूंसाठी देशभरातून विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. यात कामाख्या, हावडा, पटना, दिल्ली, जयपूर, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड या ठिकाणांहून गाड्या चालवल्या जातील. याशिवाय, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि ओंकारेश्वर या तीन ज्योतिर्लिंगांना जोडणारी विशेष सर्किट ट्रेन देखील प्रस्तावित आहे.

error: Content is protected !!