नाशिक । २०२७ साली नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, शासनाने तब्बल २,२७० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर प्रक्रिया पूर्ण केली असून, ऑगस्ट २०२५ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
प्रमुख प्रकल्पांत ४५३ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण व नुतनीकरण, वाहतूक सुलभीकरण, आणि तीर्थक्षेत्र जोडणी यांचा समावेश आहे. विशेषतः नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचे सहापदरीकरण करण्यात येणार असून, कुंभमेळ्यातील वाहतुकीचा हा मुख्य दुवा ठरणार आहे.
याशिवाय, राज्यमार्ग ३७ चे ९९ कि.मी. लांबीचे व १० मीटर रुंदीचे बाह्यवळण मार्गात रूपांतर करून मुंबई, पुणे, धुळे, संभाजीनगर, पालघर आणि सुरत येथून येणार्या वाहनांची वाहतूक शहराबाहेरून वळवण्याची योजना आखण्यात आली आहे.
ओढा आणि कसबे-सुकणे रेल्वे स्थानक, ओझर व शिर्डी विमानतळ, तसेच समृद्धी महामार्गावरील इंटरसेक्शनना जोडणारे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. भाविकांची धार्मिक यात्रा सुलभ करण्यासाठी, कावनाई, श्री क्षेत्र टाकेद, चक्रतीर्थ बेजे या उपतीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्तेही सुधारले जाणार आहेत.
सर्व प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, वर्क ऑर्डर लवकरच जारी होणार आहे. या प्रकल्पांमुळे २०२७चा सिंहस्थ कुंभमेळा अधिक सुसंघटित, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुलभ ठरेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. तसेच, नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला दीर्घकालीन चालना मिळण्याची अपेक्षा आहे.










