नाशिक । सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासन हालचालींना वेग देत आहे. याच अनुषंगाने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या महाव्यवस्थापक इति पांडे या बुधवर (दि.३०) नाशिकरोड रेल्वे स्थानकाला भेट देणार आहेत.
सिंहस्थ कुंभमेळयाच्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू करण्यात आली आहे. दर आठवडयाला विविध विभागांचा आढावा घेण्यात येत आहे. कुंभमेळा काळात मोठया प्रमाणावर भाविक रेल्वे मार्गे येणार असल्याने रेल्वे प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकरोड स्थानका उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. महाव्यवस्थापक पांडे यांच्या दौर्यात नाशिकरोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म वाढवणे, प्रतीक्षा कक्ष सुधारणा, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, तिकीट बुकिंग व्यवस्था, तसेच प्रवाशांच्या व भाविकांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक आणि स्वयंसेवक योजनेचा आढावा घेतला जाईल.
यासोबतच इगतपुरी, देवळाली, ओढा आणि कसेबे-सुकणे यांसारख्या उपनगरी रेल्वे स्थानकांवरही सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. प्रस्तावित मल्टी मॉडेल हब बाबत विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही दौर्यावर
याच पार्श्वभूमीवर येत्या शनिवार (ता. ३ मे) रोजी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार हे सुद्धा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिकच्या दौर्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दौर्यांमुळे कुंभमेळ्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सक्षम आणि सुरळीत व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









