सिन्नर । राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात सध्या सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या समर्थकांनी उद्या (शनिवार, सकाळी १० वाजता) सिन्नर बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात एकत्र येत शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या कोकाटे यांच्यावर ऑनलाईन गेम संदर्भात सुरू असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले असताना, त्यांच्याविरोधात खोटी बदनामी करून लोकांमध्ये गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप करत समर्थकांनी निषेध करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, मंगळवारी कोकाटे यांचा राजीनामा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोकाटे यांचे समर्थक म्हणतात की, मंत्री कोकाटे यांच्यावरील आरोप हेतुपुरस्सर पसरवले जात असून, त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्यासाठी राजकीय खेळी केली जात आहे. त्यांच्या कार्याची पद्धत आणि कष्टांची जनतेने दखल घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्या बदनामीचा कट आम्ही खपवून घेणार नाही.
या पार्श्वभूमीवर सिन्नर मतदारसंघात कोकाटे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजुट दाखवणार आहेत. राजकीय विरोधकांनी कोकाटे यांची बदनामी थांबवावी, अन्यथा जनतेतूनच उत्तर दिलं जाईल, असा इशारा समर्थकांनी दिला आहे.










