भाजपमध्ये प्रवेश करणार का ?काँग्रेस नेत्याने स्पष्टच सांगितलं

नाशिक | नाशिकमध्ये भाजपचा मोठा प्रवेश सोहळा रविवार, (२७) रोजी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात पार पडणार आहे. या सोहळ्यात शिवसेना (ठाकरे गट) तसेच काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. विशेषतः काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, दिवे यांनी स्वतः पुढे येत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

“मी भाजपमध्ये प्रवेश करत नाही, आणि मी काँग्रेसमध्येच कार्यरत आहे,” असे ठाम सांगत राहुल दिवे यांनी स्पष्ट केले की, त्या संदर्भातील सर्व अफवा निराधार असून त्यांचा काँग्रेस पक्षावर पूर्ण विश्वास आहे.

दिवे यांनी स्पष्ट केले की, “गेल्या काही दिवसांपासून माध्यमांतून माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र मी अजूनही काँग्रेस पक्षात आहे आणि पुढेही राहणार आहे. काँग्रेसमध्येच काम करत राहणार असून पक्षाच्या विचारधारेवर माझा विश्वास आहे. राज्यस्तरावर पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या मी पार पाडल्या आहेत आणि आगामी काळात काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे काँग्रेस गोटात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र त्यांच्या या अधिकृत खुलाशामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

राहुल दिवे सध्या काँग्रेस प्रदेश समितीचे सचिव असून नाशिकमध्ये पक्षाच्या कार्यात सक्रिय आहेत. आगामी महापालिका निवडणूक काँग्रेसकडूनच लढवणार असल्याचं त्यांनी ठामपणे जाहीर केलं आहे.

या पार्श्वभूमीवर, भाजपच्या रविवारी होणाऱ्या प्रवेश सोहळ्यात ठाकरेंच्या गटाचे उपनेते सुनील बागुल, मामा राजवाडे यांच्यासह इतर पदाधिकारी पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असले तरी, राहुल दिवे यांचा त्यात समावेश नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

“माझ्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये,” असेही त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!