नाशिक । सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३ कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी नियोजन करण्यात येत आहे. कुंभमेळयात मोठया संख्येने भाविक रेल्वे येणार असल्याने नाशिकरोड रेल्वे स्थानकात गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष व्यवस्था करण्याचे प्रस्तावित आहे. याकरीता रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या गर्दी व्यवस्थापनासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी होल्डिंग एरिया ची व्यवस्था करण्यासाठीच्या कामांना रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार प्रत्येकी ५००० प्रवासी क्षमता असलेले २१०० चौ. मी.चे कायमस्वरूपी व तात्पुरता असे दोन स्वतंत्र होल्डिंग एरिया उभारण्यात येणार आहेत.
फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून गर्दी नियंत्रणासाठी देशातील प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाची निर्मिती करण्याचा निर्णय झाला. राज्याचे पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक रोड रेल्वेस्थानकावर देखील आगामी कुंभमेळा- २०२७ दरम्यान अशा प्रकारची भाविकांची गर्दी टाळण्यासाठी होल्डिंग एरिया उभारण्याची मागणी केली होती.
सिंहस्थ कुंभमेळयात सुमारे ३ कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. २०१५ च्या सिंहस्थाच्या तुलनेत सुमारे ५० पट अधिक आहे. त्यानुसार प्रत्येकी ५००० प्रवासी क्षमता असलेले २१०० चौ. मी.चे कायमस्वरूपी व तात्पुरता असे दोन स्वतंत्र होल्डिंग एरिया उभारण्यात येणार आहेत. दोन्हींमध्ये स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, वॉशबेसिन व पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल तसेच तात्पुरता होल्डिंग एरियातील स्वच्छतागृहे पोर्टेबल असणार आहेत.कायमस्वरूपी होल्डिंग एरिया अंतर्गत सण- उत्सव काळात गर्दीच्या नियंत्रणासाठी प्रवाशांना ट्रेन येईपर्यंत स्टेशनबाहेरील प्रतीक्षास्थळांवर थांबवले जाणार आहे. फक्त आरक्षित तिकिटधारकांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार आहे.
अशा असतील सुविधा
होल्डिंग एरियामध्ये प्रवाशांसाठी तिकीट काऊंटर, पब्लिक ड्रेस सिस्टम, माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, निरीक्षणासाठी एआय आधारित कॅमेरे, प्रवाशांचे साहित्य स्कॅनर, प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी साइनेज अशा अनेक एकत्रित सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच एक केंद्रीकृत कमांड आणि नियंत्रण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. हे केंद्र प्रभावी देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अंदाजे वेळापत्रकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांनी सुसज्ज असेल.









