हिंगोली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा अद्यापपर्यंत झाली नसल्याचं स्पष्ट विधान पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते सुनील तटकरे यांनी केलं आहे. ते हिंगोली येथे माध्यमांशी संवाद साधत होते. जर अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा झाला, तर तो भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत करूनच घेतला जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.
तटकरे म्हणाले, आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो तेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करूनच निर्णय घेतला. त्यामुळे भविष्यात कोणताही मोठा राजकीय निर्णय घ्यायचा झाला, तर तो देखील भाजपच्या सहमतीनेच घेतला जाईल.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी सांगितले की, राज्यातील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय कायम असून, निवडणुकीसाठी युतीमध्येच लढण्याचा निर्णय झाला आहे. प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे स्थानिक नेत्यांशी चर्चा करून, मग अंतिम निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत
तटकरे यांनी अजित पवार यांच्याबाबत भावना व्यक्त करताना म्हटलं की, अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, ही माझ्यासह प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्याची इच्छा आहे. मात्र, वास्तव आमच्या लक्षात आहे. सध्याच्या संख्याबळात भाजपकडे 131, शिवसेनेकडे 60 आणि आमच्याकडे 41 आमदार आहेत. त्यामुळे निर्णय घेताना वास्तवाचं भान ठेवावं लागेल.
भुजबळांचं समर्थन, विरोधकांचा टोला
तटकरे यांच्या विधानाला मंत्री छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला. तीनही पक्ष सत्तेत एकत्र आहेत, त्यामुळे भविष्यातील निर्णयही एकत्रित घ्यावे लागतील, असं भुजबळ म्हणाले. दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावत म्हटलं, फडणवीसांच्या बैलगाडीला जुंपलेले बैल चारा खाणार असतील, तर विचारलं तर पाहिजेच! असा टोला विरोधकांनी लगावला.









