खा. दुबेंचे ठाकरे बंधूंना आव्हान !दुसर्‍या राज्यात जाऊन हिंदीविरोधी वक्तव्य करून दाखवा

मुंबई । भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी दोन्ही नेत्यांवर थेट टीका करत म्हटले की, सुरक्षा काढून दुसर्‍या राज्यात जाऊन हिंदीविरोधी वक्तव्य करून दाखवा, मग तुम्हाला तिथले लोकच काय ते उत्तर देतील.

घरात सगळेच वाघ असतात
‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत दुबे म्हणाले की, स्वतःच्या घरात सगळेच वाघ असतात, बाहेरचं मैदान गाठा मग कळेल. ते पुढे म्हणाले की, राज आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जनतेत रोष आहे. मी कायदा हातात घेणार नाही, पण जनभावना स्पष्ट आहे.

हिंदीविरोधी भूमिकेवरून टोला
दुबे यांनी मराठी विरुद्ध अमराठी मुद्द्यावरूनही टिका करतांना म्हटले की, जर अमराठी लोक नको असतील, तर स्टेट बँक, एलआयसी, हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईबाहेर हलवा. फक्त गरिब अमराठी लोकांना टार्गेट करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

हिंदी भाषेला विरोध का?
दुबे म्हणाले की, इंग्रजी शिकवताना कुणालाच अडचण वाटत नाही, पण हिंदी शिकवली तर विरोध का? देशात सर्वत्र मराठी माणसं निवडून येतात आणि हिंदी भाषिकही महाराष्ट्रात शांततेने राहतात. याच मुद्द्यावर त्यांनी मराठी-हिंदी मतभेदांवर संतुलन साधण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र महत्त्वाचा, पण आम्हीही करदाता
मुंबईतील बड्या उद्योगगटांच्या मुख्यालयांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा आहे, हे मान्य आहे. पण त्याच वेळी स्टेट बँक, रिलायन्स, बिर्ला, एलआयसी यांचे मुख्यालय जरी येथे असले तरी ते देशभर कार्यरत आहेत. त्यामुळे इतर राज्यांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

error: Content is protected !!