नाशिक । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत एकेकाळी प्रभावीपणे पक्षाची बाजू मांडणारे प्रवक्ते प्रकाश महाजन सध्या पक्षातील उपेक्षेमुळे खूपच व्यथित आहेत. नाशिकमध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय शिबिरात त्यांना निमंत्रण न दिल्याने, त्यांनी स्पष्ट शब्दांत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या शिबिरात इतर वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी सहभागी असताना, प्रकाश महाजन यांची अनुपस्थिती अनेकांच्या लक्षात आली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, “मी नाराज नाही… पण खिन्न आणि दुःखी आहे. महाजन यांनी सांगितले की, राणे यांच्या वक्तव्यावरून माझ्यावर टीका झाली, पण पक्षातील कोणत्याही नेत्याने माझी उघड बाजू घेतली नाही.त्यांनी या प्रसंगानंतर स्वतःच लढण्याचा निर्णय घेतला. मात्र पक्षातून पाठिंबा मिळाला नाही, हे त्यांना चटकन लागले.
माझ्यावर आरोप, कुटुंब अस्वस्थ
महाजन यांनी कबूल केलं की, कुटुंबाला धमक्यांचे फोन येत होते, त्यामुळे वातावरण अस्थिर झाले होते. पक्षाच्या शिबिरात दिवाळी आहे, पण माझ्या घरात अंधार आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महाजन यांनी स्पष्ट केलं की ते कोणावर नाराज नाहीत, मी स्वतःवरच नाराज आहे. माझ्या कामगिरीवर महाराष्ट्र सैनिकांनी अभिमान बाळगावा अशीच माझी इच्छा होती, असं त्यांनी नमूद केलं.
देव बदलणार नाही, तोंड उघडणार नाही
त्यांनी ठामपणे सांगितलं की, मी देव बदलणार नाही आणि न सांगता कुठे जाणार नाही. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर केलेल्या भाष्यामुळे जर कोणी दुखावलं असेल, तर त्याची माफीही मागितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रकाश महाजन यांनी शेवटी अत्यंत भावनिक शब्दांत आपली वेदना मांडली – घरातच जर मान नसेल, तर बाहेर कुठे मिळेल? पक्ष जर मला अशी वागणूक देणार असेल, तर कोणत्या तोंडाने त्यांचं प्रतिनिधित्व करू?असेही ते म्हणाले.









