२०१४ पासून भाजपसोबत जाण्याची चर्चा – तटकरेंचा गौप्यस्फोट

नाशिक – २०१४ पासून चार-पाच वेळा एनडीएमध्ये जाण्याची चर्चा झाली होती. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आम्ही निकाल पाहत होतो. त्यावेळी भाजपला १२२ जागा मिळाल्यानंतर मी पत्रकारांसमोर येऊन भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.

नाशिक येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, २०१७, २०१९ आणि २०२२ मध्येही भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली, पण वेगवेगळ्या कारणांमुळे ती प्रत्यक्षात आली नाही. मात्र, आमच्या मूळ विचारधारेशी एकनिष्ठ राहत आम्ही आता एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीत ४१ जागांवर यश मिळाले असून, नाशिक जिल्ह्यात ७ जागांवर आमच्या उमेदवारांनी विजय मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मी राज्यभर दौरा करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या माध्यमातूनच आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय राज्य समन्वय समितीच्या बैठकीत झाला आहे. मात्र, जिल्हा आणि विभागीय पातळीवर काय स्थिती आहे हे समजून घेतले जात आहे. काम करणार्‍यांना संधी दिली जाईल आणि संघटनात्मक नियुक्त्यांचा आढावा घेऊन आवश्यक ती नियुक्त्या केल्यात जातील, असेही ते म्हणाले.

योग्यवेळी निर्णय घेवू
भाजपचा १०० प्लस नारा महत्वाकांक्षी आहे. ते मोठे पक्ष आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणुकीसाठी पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. राज्य समन्वय समितीत महायुती म्हणूनच निवडणूक लढावी असा निर्णय झाला आहे परंतू परिस्थितीनूसार बघू असेही ते म्हणाले. शहरात पक्षबळ कमी असल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, यासाठी भुजबळ साहेबांना विनंती केली असून त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष मजबूत होईल असा विश्वास आहे.

पालकमंत्री पदाबाबत निर्णय लवकरच
रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय रखडलेला असून तो मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्रीपद मिळावे ही तिनही पक्षांची इच्छा आहे आणि त्यात चुकीचे असे काही नाही पंरतू तीनही पक्षांच्या चर्चेतून हा विषय लवकरच मार्गी लागेल, असे तटकरे म्हणाले.

घोडा मैदान जवळ आहे, पाहूया
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर तटकरे म्हणाले, तो त्यांचा विषय आहे. आम्ही आमचा पक्ष कसा बळकट करू, यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. कोण एकत्र येणार याच्या चिंतेपेक्षा पक्ष संघटना मजबूत करणे आमचे उद्दिष्ट आहे. या विषयावर अधिक बोलणे टाळत त्यांनी घोडा मैदान जवळ आहे, पाहूया, असे मिश्किल उत्तर दिले.

error: Content is protected !!