नाशिक । भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात वास्तवदर्शी मॉक ड्रिल पार पडले. यामध्ये नागरी संरक्षण दल, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, होमगार्ड, अग्निशमन दल यांच्यासह विविध आपत्कालीन यंत्रणांचे कर्मचारी आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते.
मुळात दीड तास नियोजित असलेली ही मॉक ड्रिल तीस मिनिटांत पूर्ण करण्यात आली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. मात्र, मॉक ड्रिल संपल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घटनास्थळी थांबत सर्व यंत्रणांच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी उपस्थित विभागप्रमुखांना विचारले की, या कवायतीत कोणते खाते कमी पडले? ही ड्रिल आणखी कमी वेळात पार पाडता आली असती का? कुठे अडचणी आल्या? याविषयी लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेषत: महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकार्यांशी चर्चा करताना जिल्हाधिकार्यांनी थेट विचारणा केली – तुम्हाला कॉल किती वाजता आला? त्यानंतर किती वेळात घटनास्थळी पोहोचलात? वाहतूक कोंडीमुळे विलंब झाला का? अशा प्रश्नांमधून त्यांनी यंत्रणेच्या प्रत्यक्ष प्रतिसाद वेळेचा गंभीरपणे अभ्यास केला. या संवादातून लक्षात आले की, काही ठिकाणी वाहतूक अडथळ्यांमुळे विलंब झाला असून या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत.
पुढच्या वेळेस कोणतीही आपत्ती वा मॉक ड्रिल असेल, तर सर्व यंत्रणांनी अधिक तत्परतेने, अचूक समन्वयाने आणि अडथळे दूर करून काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकार्यांनी सर्व उपस्थित यंत्रणांना दिले.







