नाशिक : नाशिक मध्ये होणाऱ्या मॉक ड्रिल संदर्भात सर्वांमध्येच उत्सुकता लागली असून नेमकं सायरन कधी वाजणार ? ब्लॅकआऊट कधी होणार? मॉक ड्रिल कशा प्रकारचे असणार याबाबत आता उत्सुकता लागून आहे या संदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली.
भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरामध्ये 7 मे म्हणजे आज मॉक ड्रिल होत आहे. नाशिकमध्ये देखील हे मॉक ड्रिल होणार असून या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, नाशिकमध्ये दुपारी चार वाजता एक सायरन वाजवला जाईल दोन मिनिट हा सायरन वाजेल. जिल्हाधिकारी कार्यालय आणि केटीएचएम महाविद्यालय येथे हा सायरन वाजेल. या सायरनद्वारे
या हल्ल्याचे संकेत दिले जातील. त्यानंतर नागरी संरक्षण दलाच्या विभागामार्फत सर्व नागरिकांना अलर्ट देऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याबाबत संकेत दिले जातील.
यानंतर बॉम्ब ब्लास्ट सारखा एक सीन तयार केला जाईल आणि फायर रेस्क्यूचं हे मॉक ड्रिल असेल. यामध्ये पोलीस होमगार्ड, अग्निशामक, एनसीसी,एनएसएस या सर्व विभागांचा समावेश असेल. विभागांची एकूणच तयारी याचा अभ्यास या प्रात्यक्षिकाद्वारे केला जाईल.
दीड तासाची सुमारे हे मॉक ड्रिल असेल यानंतर पुन्हा एक सायरन वाजेल याद्वारे परिस्थिती नियंत्रणात असल्याचा संकेत देत नागरिकांनी बाहेर पडण्यास हरकत नाही अशा पद्धतीचा मेसेज या माध्यमातून दिला जाणार आहे.
या ठिकाणी होणार ब्लॅक आऊट
मॉक ड्रिल दरम्यान ब्लॅक आऊट देखील होणार आहे परंतु आज नाशिकमध्ये ब्लॅक आऊट होणार नाही असे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी स्पष्ट केले. आजचा ब्लॅक आउट फक्त मुंबईमध्येच होईल नाशिकमध्ये अद्याप पर्यंत या संदर्भात कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे ब्लॅकआऊट संदर्भात नंतर कळवण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले.








