नवी दिल्ली । प्रतिनिधी – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएल २०२५ स्पर्धेसंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यांवर स्थगितीची टांगती तलवार आहे. यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेवून बीसीसीबायच्यावतीने याबाबत घोषणा केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. ८ मेच्या रात्री पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती भागांवर ड्रोन हल्ले करण्यात आले, त्यानंतर भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामुळे परिस्थिती अधिक चिघळली असून भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे सुरू असलेला पंजाब विरुद्ध दिल्ली सामना मध्येच थांबवावा लागला. या घटनेनंतर खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बीसीसीआयने स्पर्धा तुर्तास स्थगित करण्याचा विचार सुरु केला आहे.
२२५ सामन्यांपैकी अनेक सामने पार पडले असून, अंतिम सामना २५ मे रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होण्याचे नियोजित होते. मात्र युद्धसदृश परिस्थितीमुळे हे आयोजन धोक्यात आले आहे. बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा समोर ठेवून पुढील निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान, पाकिस्तानातील परिस्थितीही बिघडली असून, रावळपिंडी स्टेडियमवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे पाकिस्तान सुपर लीग (PSL) चे सामने रद्द करण्यात आले आहेत. आता उर्वरित सामने दुबईत हलवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. BCCI लवकरच पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती असून, संपूर्ण देशाच्या नजरा आता बीसीसीआयच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.










