शहरातील वाहतूक कोंडी टळणार ; प्रशासनांन घेतला मोठा निर्णय

नाशिक । नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांवर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण, अनधिकृत रिक्षा थांबे आणि रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि आमदार देवयानी फरांदे यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. त्यानंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून शहरभर अतिक्रमणविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे.

सोमवार (दि. १७) रोजी आमदार देवयानी फरांदे यांनी शालिमार, सीबीएस, मुंबई नाका आणि द्वारका परिसरात पाहणी करत वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणार्‍या गोष्टींचा आढावा घेतला. या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

विशेषत: द्वारका चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने येथे सर्कलमधील वाहतूक बेट जमीनदोस्त करण्यात आले. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने मंत्री भुजबळ यांनी अधिकार्‍यांना खडसावले तसेच परिसरातील अतिक्रमण आणि अनधिकृत थांब्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले.

त्यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाईला सुरुवात केली असून सोमवारी स्वत: महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह अधिकाऱ्यांनी प्रमुख मार्गांची पायी पाहणी करत अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. द्वारका चौकातील अतिक्रमण हटविले जात असून शालिमार, सीबीएस आणि मुंबई नाका परिसरातही लवकरच मोहीम राबविली जाणार आहे.


द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी योजना तयार केल्या जात आहेत. शालिमार परिसरातील अतिक्रमणांवरही कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शहरातील अनधिकृत रिक्षा थांबे त्वरित हटवण्यात यावेत. कारवाईस विरोध करणार्‍यांवर थेट गुन्हे दाखल करावेत. काही कर्मचारी अतिक्रमण धारकांशी संगनमत करत असल्याचे दिसून आले असून, पुढे असे प्रकार आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाईल.
आमदार देवयानी फरांदे

महापालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अतिक्रमणविरोधी मोहिम राबवताना अडचणी येत आहेत. यासाठी आउटसोर्सिंग करण्याचे ठरवले असून त्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच शहरात व्यापक कारवाई सुरू झालेली दिसेल. अतिक्रमणधारकांकडून जप्त केलेला माल परत केला जाणार नाही.
मनिषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका

महापालिकेच्या कारवाईला पोलीस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य असेल. आज रिक्षा थांबे आणि बस थांब्यांचा सर्वे करण्यात आला आहे. आज किंवा उद्या हे थांबे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेऊ. शहरातील ३५० पानटपर्‍या मॅप करण्यात आल्या असून त्यांची तपासणी नियमित केली जाते. तक्रारी आल्यास कठोर कारवाई केली जाईल.
संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त नाशिक

error: Content is protected !!