नाशिक । शहरातील मुंबई नाका ते द्वारका या प्रमुख मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी, उड्डाण पुलाखाली वाढलेली भिक्षेकरींची गर्दी आणि सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण याबाबत छगन भुजबळ यांनी आज अधिकार्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रत्यनातून व्दारका चौकातील सर्कल हटविण्यात येत असून मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर या ठिकाणी सिग्नल बसविण्यात येणार आहे. परंतू हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून या कामाची मंत्री भुजबळ यांनी व्दारका चौकात भेट देत पाहणी केली. उडडाणपूलावर पावसाळी कामाची दुरूस्ती केली जात असल्याने वाहने खाली रस्त्यावर येतात. त्यामुळे चौकात दिवसभर वाहतूक कोंडी होते. व्दारकापासून थेट सारडा सर्कलपर्यंत रांगा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परिणामी या ठिकाणांहून मार्गक्रमण करतांना वाहनधारकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.
मुंबई नाका परिसरात सुरू असलेल्या सिग्नल यंत्रणा बसविण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी भुजबळ आज अचानकच दाखल झाले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महापालिका, पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना फटकारले.
भुजबळ म्हणाले, मुंबई महापालिका मी स्वतः सांभाळली आहे. कोणाचं काय काम आहे, हे मला माहीत आहे. अधिकार्यांनी जर आपलं काम वेळेत केलं नाही, तर मी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करेन!असा दमच भुजबळांनी अधिकार्यांना भरला.
उड्डाणपुलाखाली भिक्षेकरींनी ताबा घेतल्याबददल विचारणा केली असता, ते आमचं काम नाही, असं उत्तर महापालिकेच्या अधिकार्याने दिलं. या उत्तराने भुजबळ चांगलेच संतापले. ते पुढे म्हणाले, सध्याचे अधिकारी खूप बिझी झाले आहेत. मानस हॉटेलमध्ये जायला वेळ आहे, पण इथे कामासाठी यायला वेळ नाही. लोकांचे हाल होत आहेत, हे पाहिलं जात नाही का?
यावेळी भुजबळ यांनी संबंधित ठेकेदार व अधिकार्याना वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले. शहरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाबाबत तातडीने पावलं उचलण्याचा इशारा देत, माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा त्यांनी दिला.










