Kumbh mela : कुंभमेळा तयारी : द्वारका-नाशिक रोड उड्डाणपूल, नवीन रुग्णालय, २०० नवीन बसेसची मागणी

नाशिक : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करून नाशिकचा देशभरात लौकिक व्हावा, यासाठी शाश्वत कामे करतानाच दीर्घकालीन सुविधा उभारण्याच्या सूचना मंत्रीमंडळ समितीने केल्या. कुंभमेळा मंत्री तथा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मंत्री समिती प्रमुख गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मंत्री समितीची बैठक घेण्यात आली.

यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त तथा सदस्य सचिव शेखर सिंग, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे जलेज शर्मा, पोलीस विशेष महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नाशिकचा कुंभमेळा पावसाळ्यात होत असल्याने विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने सर्व शक्यतांची पडताळणी करून कार्यवाही करावी. १२ वर्षांपूर्वीच्या कुंभमेळ्याचा अनुभव लक्षात घेता, यावेळी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने त्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, ज्या सुविधा कुंभमेळ्याच्या निमित्ताने उपलब्ध होत आहेत त्या कायमस्वरूपी नाशिकच्या जनतेला उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टिकोनातून नियोजन होणे आवश्यक आहे. तसेच गोदावरी नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर तातडीने कार्यवाही करून ते नदीपासून वेगळे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निर्देश दिले.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिक येथे नव्या रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे सांगितले. ज्या सुविधा उभारण्यात येत आहेत त्यांचा वापर भविष्यात होण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, असे सूचित केले. तसेच नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा — सप्तशृंगी गड, सर्व तीर्थटाके, कपिलधारा तीर्थ कावनई, तपोवन, शुल्क तीर्थ राममंदिर इगतपुरी यांसह इतर पर्यटन क्षेत्रांचा — विकास या निमित्ताने व्हावा, असेही त्यांनी सांगितले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपुलाबाबत प्रशासनाने तातडीने काम सुरू करावे, असे सांगितले. हे काम सुरू करताना जनतेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलन प्रसंगी नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ब्रँडिंग करण्याचे सुचविले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाच्या वतीने २०० नवीन बसेस महामंडळास उपलब्ध करून द्याव्यात, या बसेस कुंभमेळ्यानंतर राज्यात उपयुक्त ठरतील, असे सांगितले.

पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी नाशिक विमानतळ परिसरात देश-विदेशातून येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष सुविधा, तसेच इतर ठिकाणीही अशा व्यक्तींसाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागा निश्चित करण्याचे सुचविले.

यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण तसेच इतर विभागांच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. आरोग्य, पर्यटन, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, अन्न नागरी व ग्राहक संरक्षण, जलसंपदा, विमानतळ प्राधिकरण, रेल्वे प्राधिकरण, महानगरपालिका, नाशिक महानगर विकास प्राधिकरण आदी विभागांचा सविस्तर आढावा आणि कामकाजाची सद्यस्थिती मंत्री समितीच्या सदस्यांनी जाणून घेतली.

error: Content is protected !!