Flood update : पावसाची विश्रांती, पूर ओसरला : काय आहे आजची पूरस्थिती

नाशिक । नाशिक शहरासह जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. त्यामुळे गोदावरीला आलेला पूर ओसरला असून सायंकाळपर्यंत दुतोंडया मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले. तर, गंगापूर धरणातून करण्यात येणारा १० हजार क्युसेकचा विसर्ग १४४२ क्युसेकपर्यंत घटविण्यात आला आहे.

रविवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून १० हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता, त्यामुळे गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली. यंदाच्या हंगामात प्रथमच दुतोंडया मारुती पूर्णतः बुडाला. पाण्याचा प्रवाह इतका होता की थेट भांडीबाजारात पाणी शिरले.

येथील व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील माल, साहित्य वाचविण्यासाठी व्यावसायिकांची तारांबळ उडाली. मात्र, रविवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. सोमवारीही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता, मात्र सकाळपासून तुरळक पावसाच्या सरी वगळता पावसाने विश्रांती घेतली.

पावसाने विश्रांती घेतल्याने पुराच्या पाणीपातळीत घट झाली. सकाळपासूनच लहान व्यावसायिकांनी दुकानांची आवराआवर सुरू केली होती. दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे दुकानांमध्ये स्वच्छता करण्यात येत होती. सायंकाळपर्यंत पूरपातळीत घट झाल्याचे दिसून आले. पुराचे पर्जन्यमापक असलेल्या दुतोंडया मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागले.

दरम्यान, सकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी गोदाघाटावर भेट देत पूरस्थितीचा आढावा घेतला. तर मंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.

error: Content is protected !!