I Love Mohammad या ट्रेंडवरून देशभरात जातीय दंगलीसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. हा I Love Mohammad ट्रेंड कुठे, कोणी आणि कसा सुरू झाला आणि त्यावरून नेमका वाद का उद्भवला यासोबतच या ट्रेंडला प्रत्युत्तरदाखल सुरू झालेला I Love महादेव ट्रेंड नेमका आहे काय हे जाणून घेऊया…
I Love Mohammad हा ट्रेंड उत्तर प्रदेशातील कानपूरमधून सुरू झाला. उत्तर प्रदेशच्या उन्नाव, बरेली, कन्नौज, आग्रा, गोंडा या शहरात आणि काशीपूर, तेलंगणातील हैदराबाद इथेही I Love Mohammad या घोषवाक्याचे फलक हातात घेत मुस्लिम समाज मिरवणुका काढत आहेत.
या पोस्टरवरून झालेल्या राजकीय वाद-विवादानंतर अनेक राज्यांत हिंसक निदर्शनेही झाली. हा वाद केवळ कानपूर आणि उन्नावपुरता मर्यादित न राहता, आता यूपीमधील भदोही आणि शाहजहानपूर, उत्तराखंडमधील ऊधमसिंह नगर, तसेच महाराष्ट्रातील ठाणे आणि लातूरपर्यंत पोहोचला आहे.
वादाची सुरुवात कधी आणि कशी झाली?
४ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी केली गेली. या दिवशी संध्याकाळी मुस्लिम समाजाकडून मिरवणुका काढल्या जातात. कानपूरमधल्या रावतपूरमध्ये ज्या मार्गावर मिरवणूक जाणार होती त्या मार्गावर I Love Mohammad असा फलक लावण्यात आला होता. या फलकाला तेथील हिंदू समुदायाने विरोध दर्शवला. ही नवीन प्रथा का सुरू केली जात आहे असा प्रश्न विचारला. हा वाद वाढू नये म्हणून पोलिस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत दोन समुदायांमध्ये समेट घडवून हा वाद मिटवला.
सुरुवातीला वातावरण शांत होते. परंतु काही राजकारण्यांच्या वक्तव्यांमुळे वाद वाढला आणि लोकांमध्ये संताप निर्माण झाला. कानपूरनंतर उन्नाव, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातही निदर्शने सुरू झाली. उन्नावमध्ये निदर्शकांनी दगडफेक केली. शिवाय पोलिसांच्या ताब्यातून दोन तरुणांना सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
कानपूरचे डीसीपी दिनेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या नियमांनुसार या मिरवणुकीसाठी कोणत्याही नवीन पद्धती सुरू करता येत नाहीत. जे यापूर्वीपासून सुरू आहे तसंच ठेवण्याचा नियम आहे. परंतु मिरवणुकीवेळी काही लोकांनी दरवर्षी जिथे तंबू उभारला जायचा त्याऐवजी दुसर्या ठिकाणी तंबू उभारून I Love Mohammad हा फलक लावला.
मात्र, निदर्शकांचे म्हणणे आहे की पैगंबर मोहम्मद यांचा अपमान ते कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाहीत. त्यातून हा वाद सुरू झाला आहे. तो देशातील प्रत्येक राज्यात पोहोचला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी या विरोधात मुस्लिम समुदाय रस्त्यावर उतरला होता. शिवाय अनेक मुस्लिम तरुणांनीही आपलं स्टेटस I Love Mohammad ठेवल्याचं आढळून आलं आहे.
I Love Mahadev चा ट्रेंड
या सर्व प्रकरणाविषयी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या. याला प्रत्युत्तर म्हणून I Love Mahadev ट्रेंड सुरू झाला. हा ट्रेंड वाराणसीच्या रस्त्यावरही वेगाने पसरतो आहे. वाराणसीत युवकांनी आपल्या हातावर I Love Mahadev असा टॅटू काढायला सुरुवात केली आहे. वाराणसी हे शिवाचे शहर आहे हे स्पष्ट करण्यासाठी वाराणसीत हा ट्रेंड झपाट्याने पसरतो आहे.











