दुतोंडया मारूती का मानला जातो जलमापक? काय आहे इतिहास ?

नाशिक । गोदावरीला पूर आला की, गोदाकाठचा दुतोंडया मारुती किती बुडाला ? असा प्रश्न नाशिककर अगदी सहजपणे विचारतात. आजही गोदावरीच्या पुराची गंभीरता या दुतोंडया मारुतीवरून ओळखली जाते. रविवार (दि. २८) रोजी गोदावरीला आलेल्या पुरात दुतोंडया मारुती पूर्णपणे बुडाला. दुतोंडया मारुती बुडाला की, गोदावरी धोक्याच्या पातळीवर असल्याचे मानले जाते. परंतु या दुतोंडया मारुतीची मूर्तीची स्थापना नेमकी कधी आणि कोणी केली हे आपण जाणून घेणार आहोत.

दुतोंडया मारुतीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा १९४२ मध्ये करण्यात आली. दुतोंडया मारुतीची पूर्वेकडे असलेली मूर्ती ही शंकर परदेशी यांनी तयार केली आहे, तर पश्चिमेकडची मूर्ती नथुराम भोईर यांनी तयार केली आहे.

१९३९ चा पूर आला तेव्हापासून ही मूर्ती पुराशी जोडली गेली. पण पूर्वीची मूर्ती भंगली आणि त्यानंतर १९४२ पासून मारुतीची नवी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९५४ मध्ये गंगापूर धरण बांधण्यात आले. पावसाळ्यात येणारे पाणी कुठेही अडवले जात नव्हते त्यामुळे दुतोंडया मारुतीची मूर्ती पुराशी जोडली गेली.

दुतोंडया मारुतीची पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती राममंदिराच्या दिशेने हात जोडून उभी आहे. तर पश्चिम बाजूला जी मूर्ती आहे ती हातात गदा घेऊन राक्षसाला पायाखाली चिरडणार्‍या संकटमोचक हनुमानाची आहे. हा मारुती स्वातंत्र्यपूर्व काळात साडेपाच फूट उंचीचा होता, सध्या ही मूर्ती ११ फूटांहून अधिक आहे. १९३९ मध्ये जो पूर आला त्यावेळी दुतोंडया मारुतीची मूर्ती बुडाली. तसेच नारोशंकराच्या घंटेला पाणी लागले होते.

दुतोंडया मारुती ही केवळ एक धार्मिक मूर्ती नसून, एक प्रकारे जलसूचक देखील आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी मोजण्यासाठी तिचा वापर केला जातो. पुराचा अंदाज घेण्यासाठी, मारुतीच्या स्पर्शाच्या भागावरून पाण्याची पातळी किती आहे, हे पाहिले जाते.

मूर्तीचे एक तोंड (जे श्रीरामाकडे आहे) हे दास मारुतीचे आहे, तर दुसरे तोंड (जे नाशिक शहराकडे आहे) हे वीर मारुतीचे आहे. या दोन रूपांमधून ‘दास’ आणि ‘वीर’ या दोन्ही मारुतीच्या गुणांचे प्रतीक दर्शवले जाते.

error: Content is protected !!