नाशिकहून विमान प्रवास करणार्‍यांसाठी खुशखबर !

नाशिक । नाशिकहून विमान प्रवास करणार्‍यांसाठी खुशखबर आहे. विमान कंपन्यांनी तिकिट दरात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे विमान प्रवास आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे. नाशिकहून अहमदाबाद, इंदूर, गोवा या शहरांसाठी ३५०० रूपयांपर्यंत तिकिटे उपलब्ध होणार आहे.

सध्या पावसामुळे पर्यटनात घट झाली असून, प्रवासी संख्येत आलेल्या घसरणीचा सामना करण्यासाठी विमान कंपन्यांनी आपल्या भाड्यांमध्ये २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. नाशिकहून विमानसेवेचा मोठया प्रमाणावर विस्तार होऊ लागला आहे. नाशिक येथून हैदराबाद, अहमदाबाद, कोईम्बतूर, गोवा, इंदूर, नवी दिल्ली या शहरांसाठी सेवा दिली जाते. या सर्व सेवांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

नुकतीच ओझर विमानतळाने हवाई प्रवाश्यांचा उच्चांक गाठला. २०२३: मध्ये सुमारे २ लाख ४२ हजार प्रवाश्यांनी विमान प्रवास केला होता. यंदा यात ४० टक्क्यांनी वाढ होऊन यंदा ३ लाख ४१ हजार प्रवाश्यांनी हवाई प्रवास केला.

ओझर विमानतळ येथून दररोज सुमारे ९०० प्रवासी विमानप्रवास करतात. मे महिन्याची आकडेवारी जर बघितली तर गेल्यावर्षी मे महिन्यात २६ हजार ४५० जणांनी प्रवास केल्याची नोंद आहे. यंदाच्यावर्षी मे महिन्यात ३७ हजार ५०९ प्रवाश्यांनी विमान प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे.

मात्र आता शाळा सुरू झाल्याने पर्यटनात घट झाली आहे. त्यामुळे विमानात अनेक जागा रिकाम्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांनीही ‘मॉन्सून ऑफर’ दिली आहे. या दरांमुळे अनेक प्रवाशांना कमी किमतीत प्रवासाची संधी मिळत असून, हंगामानुसार कंपन्यांची ही धोरणे प्रवास सुलभ आणि किफायतशीर करत आहेत. विशेष म्हणजे, अलीकडेच काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या हल्ल्यानंतर या भागात जाणार्‍या विमानांचे तिकिट दरही घसरले आहेत.

असे आहेत संभाव्य तिकिट दर
नवी दिल्ली – ५,९०६ पेक्षा कमी
अहमदाबाद – ४,०५५ पेक्षा कमी
इंदूर – ३,१६३ पेक्षा कमी
हैदराबाद – ४,९२५ पेक्षा कमी
गोवा – ३,९५९ पेक्षा कमी
बेंगळुरू – ४,०७२ पेक्षा कमी
कोइम्बतूर – ४,८७६ पेक्षा कमी

error: Content is protected !!