नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. यामुळे रेपो रेट आता 5.50 टक्क्यांवर आला असून, कर्ज घेणार्या ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. रेपो रेटमध्ये कपात होताच देशातील अनेक प्रमुख बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात घट केली आहे. परिणामी, गृहकर्जासह अन्य कर्जांचे मासिक हप्ते आता कमी होणार आहेत.
पीएनबीने केली व्याजदरात कपात
पंजाब नॅशनल बँकेने रेपो रेटशी जोडलेल्या कर्जांच्या व्याजदरामध्ये कपात केली आहे. बँकेचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट 8.85 टक्क्यांवरून कमी करून 8.35 टक्के करण्यात आला आहे. ही सुधारणा 9 जूनपासून लागू होणार आहे. मात्र, एमसीएलआर आणि बेस रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बदलामुळे पीएनबीकडून गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना थेट लाभ होणार आहे. बँकेचा शेअर 110.15 रुपयांवर पोहोचला आहे.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडियाने देखील रेपो रेट कपातीनंतर आपल्या आरबीएलआर मध्ये बदल केला असून तो 6 जूनपासून लागू करण्यात आला आहे. नवा दर 8.35 टक्के आहे, जो यापूर्वी 8.85 टक्के होता. बँकेच्या शेअरमध्ये यानंतर लक्षणीय वाढ झाली असून तो 124.3 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
करुर वैश्य बँकेचा व्याजदरात बदल
करुर वैश्य बँकेने आपल्या MCLR दरामध्ये कपात केली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 6 महिन्यांचा MCLR दर 9.9 टक्के आणि एक वर्षाचा MCLR 9.8 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यापूर्वी हे दर अनुक्रमे 10 टक्के होते. त्यामुळे दीर्घकालीन कर्जदारांना याचा मोठा लाभ होणार आहे.
इंडियन बँकेकडून देखील दरात सुधारणा
इंडियन बँकेने देखील आपल्या रेपो लिंक्ड बेंचमार्क दरात (RLLR) कपात केली असून, हा दर 8.7 टक्क्यांवरून कमी करून 8.2 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. हे नवीन दर 9 जूनपासून लागू होतील. रेपो रेट कपातीनंतर बँकांकडून व्याजदरात होत असलेल्या या बदलामुळे कर्जधारकांना काहीसा आर्थिक दिलासा मिळणार आहे. नवीन कर्ज घेणार्यांनाही याचा फायदा होणार असून, मासिक हप्त्यांवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.









