नाशिक । नाशिक जिल्ह्यातील चार महिला उपजिल्हाधिकार्यांना शासनाकडून अपर जिल्हाधिकारीपदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यांची विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. पदोन्नती झालेल्या अधिकार्यांमध्ये मनरेगा उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण, निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील, भू-संपादन विभागातील उपजिल्हाधिकारी स्वाती थविल, तसेच उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांचा समावेश आहे.
शासनाने मंगळवारी (ता.२२) एकूण १९ उपजिल्हाधिकार्यांना अपर जिल्हाधिकारीपदी बढती दिली असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील या चार महिलांचा समावेश विशेष उल्लेखनीय आहे. बढतीनंतर सुरेखा चव्हाण यांची नियुक्ती मुंबईतील सिडकोमध्ये करण्यात आली आहे, तर हेमांगी पाटील यांना नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सहआयुक्त (प्रशासन) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या बुधवारी (ता.२३) आपला पदभार स्वीकारणार आहेत.
स्वाती थविल यांची नियुक्ती राज्य माहिती आयोग नाशिक येथे उपसचिव म्हणून झाली आहे, तर पल्लवी निर्मळ यांना पुण्यातील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कुंदनकुमार सोनवणे यांच्याकडे नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्पाच्या अपर जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच राहुल पाटील यांची पुणे येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात महाव्यवस्थापकपदी नियुक्ती झाली आहे.
राज्यात मागील महिन्यात १३० उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्यांना निवडश्रेणीत पदोन्नती देण्यात आली होती, ज्यानंतर या अधिकायांना पुढील पदोन्नतीची प्रतीक्षा लागली होती. शासनाने आदेश जाहीर केल्यानंतर आता संबंधित अधिकार्यांची नवीन पदांवर नियुक्ती निश्चित झाली आहे.











