ब्रह्मगिरी पर्वतावर भीषण आग, वनसंपदेची मोठी हानी

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी पर्वतावर सायंकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत हजारोच्या संख्येने असणारी मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली असून परिसरात धुराचे लोट पसरलयाचे दिसून आले.

गणपत बारी आणि पिंपळद शिवारात ही आग सर्वप्रथम दिसून आली. आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून स्थानिक नागरिकही बचावकार्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. कठीण भूभाग, उंचसखल भाग आणि संध्याकाळचे अंधारलेले वातावरण यामुळे आग नियंत्रणात आणण्याचे काम अधिक अवघड बनले आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग जाणून बुजून लावण्यात आली की नैसर्गिक कारणांमुळे, याची चौकशी सुरू आहे. वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, आग खूप मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे जंगलातील जैवविविधतेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती व प्राणी या आगीत नष्ट झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक प्रशासन व वनविभाग यांच्याकडून नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि अधिकृत माहितीचीच खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!