पाटील, मनोलकर यांना आयएएसपदी पदोन्नती

नाशिक । केंद्र सरकारने राज्यातील १२ अधिकार्‍यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) पदोन्नती दिली आहे. या अधिकार्‍यांमध्ये पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त (महसुल) महेश पाटील आणि नाशिक विभागाच्या सहआयुक्त (पुनर्वसन) मंजिरी मनोलकर यांचा समावेश आहे.

अतिरिक्त आयुक्त महेश पाटील यांनी उपजिल्हाधिकारी असताना नाशिकमध्ये विविध पदांवर काम केले आहे.अहिल्यानगर येथे प्रोबेशनरी अधिकारी म्हणून ते प्रशासकीय सेवेत रूजू झाले. भूसंपादन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून त्यांनी नाशिकमध्ये काम पाहिले. अहिल्यानगर येथे पूर्नवसन अधिकारी, नंदूरबार येथे सरदार सरोवर प्रकल्प, पुणे महापालिका उपायुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

महेश पाटील यांनी नाशिकमध्ये कार्यरत असतांना सन २००३-०४ व २०१४-१५ च्या सिंहस्थात कुंभमेळा अधिकारी म्हणून त्यांनी कुंभमेळयाचे यशस्वी नियोजन केले. दोन्ही कुंभमेळयात अतिशय अभ्यासपूर्ण, दूरदृष्टीने आणि सौम्य परंतु ठाम नेतृत्वाने नियोजन केले. नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी आखाडा परिषदेचे प्रमुख महंत आणि साधू-संतांशी त्यांनी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केले. धार्मिक भावना आणि परंपरा यांचा सन्मान राखून, प्रशासनाच्या बाजूनेही शिस्त आणि नियोजन टिकवणे ही एक मोठी जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

आखाड्यांच्या विविध मागण्या, धार्मिक विधी, मिरवणुका, स्नानाच्या तारखा यामध्ये समन्वय राखतांना त्यांनी अनेकदा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे गेले, पण कधीही नियोजनात ढिलाई दिली नाही. संपूर्ण मांडणी अत्यंत काटेकोर ठेवून कुंभमेळा सुरळीत पार पाडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच मांगीतुंगी येथे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झालेल्या महामस्तकाभिषेक सोहळयाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पेलली.

समृध्दी महामार्ग प्रकल्पाच्या सुरूवातीच्या टप्प्यात पाटील यांनी शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेत भूसंपादन प्रक्रिया पार पाडली.

पाटील यांच्यासह राज्यामधील १२ निवडश्रेणी दर्जाच्या अधिकार्‍यांना आयएएसपदी पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने सोमवारी (ता.१४) यासंदर्भात आदेश काढले. या यादीमध्ये पाटील व मनोलकर यांच्यासह विजयसिंह देशमुख, विजय भाकरे, त्रिगुण कुलकर्णी, गजानन पाटील, पंकज देवरे, आशा पठाण, राजलक्ष्मी शहा, सोनाली मुळे, गजेंद्र बावणे व प्रतिभा इंगळे यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!