नाशिक । दिवाळीच्या पर्वावर राज्य सरकारने ४७ महसूल अधिकार्यांना पदोन्नतीची भेट दिली आहे. यापैकी २३ अधिकार्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी), तर २४ उपजिल्हाधिकार्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. निवडश्रेणी मिळालेल्या अधिकार्यांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला असून नाशिकमध्ये कार्यरत महसूल अधिकार्यांचाही यात समावेश आहे.
अनेक लोकाभिमुख योजना महसूल विभागाकडून राबविण्यात येत असून त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये महसूली अधिकार्यांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या पदोन्नतीमुळे आणि बदल्यांमुळेही हा कामे अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यासह विभागात कार्यरत अनेक अधिकार्यांना पदोन्नती मिळाली असून राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
यामध्ये नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त म्हणून कार्यरत प्रज्ञा बडे मिसाळ, येथेच करमणूक कर उपायुक्त असलेल्या राणी ताटे, अंमळनेर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे नितीनकुमार मुंडावरे, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत तुकाराम हुलवळे, याशिवाय यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेले अरुण आनंदकर, सरिता नरके, वासंती माळी, निलेश जाधव, रमेश मिसाळ, सुहास मापारी यांना पदोन्नती मिळाली आहे.
पदोन्नती मिळालेले अधिकारी आणि नियुक्तीचे ठिकाण प्रज्ञा बडे-मिसाळ (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नाशिक) सुहास मापारी (प्रशासकीय अधिकारी, मा. मुख्यमंत्री कार्यालय) सरिता नरके (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सांगली) डॉ. राणी ताटे (अध्यक्ष, जात पडताळणी समिती, सोलापूर) वासंती माळी – सह आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती तुकाराम हुलवळे – अपर जिल्हाधिकारी, सिडको, नवी मुंबई निलेश जाधव – सह आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक नितीनकुमार मुंडावरे – अपर जिल्हाधिकारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण रमेश मिसाळ – अपर जिल्हाधिकारी,जालना











