त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) – त्र्यंबकेश्वर शहरालगत रात्रीच्या सुमारास एका भगवे वस्त्र परिधान केलेल्या साधूवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाकर घोटे असे या साधूंचे नाव असून, त्यांना अज्ञात व्यक्तीने हाताने मारहाण केल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवली असून, साधूंच्या मृत्यूमुळे धार्मिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
सदर हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील विविध आखाड्यांचे महंत आणि साधूंनी घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रभाकर घोटे हे कोणत्या विशिष्ट आखाड्याशी संबंधित होते की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते ‘फिरस्ता साधू’ होते, म्हणजेच एका जागी न राहता भटकंती करणारे होते.
हल्ल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
या घटनेने संपूर्ण त्र्यंबकेश्वर परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.
साधूंच्या मृत्यूमागील सत्य लवकरच उघडकीस येईल, अशी अपेक्षा नागरिक व साधू समाज व्यक्त करत आहेत.










