मुंबई । राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य मनोमिलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते युतीसाठी सकारात्मक असल्याचे दिसत होते. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या एकत्र येण्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकला असता. परंतू सेना मनसे युतीच्या चर्चा सुरू असतांनाच गुरूवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्याने युतीला फटका बसणार असे दिसते.
सकाळी मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीचं वेळापत्रक आधी ठरलेलं नसतानाही दोन्ही नेते एकाच वेळी एकाच ठिकाणी भेटल्याने, ही योजना आखून केलेली भेट असल्याचं संकेत मिळत आहेत.
राज ठाकरे आधीच हॉटेलमध्ये पोहोचले होते आणि २० मिनिटांनंतर फडणवीस तिथे दाखल झाले. विशेष म्हणजे, फडणवीस यांच्या आजच्या अधिकृत कार्यक्रमात या हॉटेलचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे फडणवीस यांनी अचानक मार्ग बदलून हॉटेलमध्ये येण्यामागे नेमकं काय रणनीती आहे, यावर प्रश्न उपस्थित केला जातोय.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीला रोखण्यासाठी रणनीती आखून राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असावी. या भेटीनंतर राज ठाकरे कोणत्या भूमिकेत असतात, याकडे राज्याच्या राजकारणाचं पुढचं दिशा ठरू शकतं. शिवसेना मनसे एकत्र येण्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही असे भाजप नेते सांगत असले तरी, राजकारणात काहीही होउ शकते याची पुरेपुर कल्पना असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ही युती रोखण्यासाठी पावलं उचलल्याचे या भेटीतून दिसून येते.










