नाशिक । लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या व राज्यसभा सदस्य सोनिया गांधी यांचे नाव सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने एका मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोपत्रात दाखल केले आहे. हे आरोपपत्र नॅशनल हेराल्ड खटल्यासंदर्भातील आहे.सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावे आरोपपत्रात दाखल झाल्याचे कळताच भाजपा युवा मोर्चा नाशिकच्या वतीने आज निषेध काँग्रेस भवन समोर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या व राज्यसभा सदस्य सोनिया गांधी यांचा निषेध करत तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी महात्मा गांधी रोडवरील मेहेर सिग्नल ते रेड क्रॉस सिग्नल मार्गावर मोर्चा काढण्यात येउन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्ते काँग्रेस कमिटी समोरून जात असतांना अचानक कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन समोर ठियया मांडत घोषणाबाजी केली. यावेळी तणाव टाळण्यासाठी पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
नॅशनल हेराल्ड प्रकरण हे नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या अधिग्रहणाशी संबंधित आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्याही नावाचा समावेश आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ साली एक याचिका दाखल केली आणि या याचिकेत काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला.
सत्र न्यायालयाने आयकर विभागाला नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि गांधी कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची परवानगी दिली. त्यानंतर हे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाकडे सोपवण्यात आले. या चार्जशीट मध्ये आरोप करण्यात आले की, गांधी कुटुंबाने यंग इंडियन लिमिटेड (वायआयएल) नावाच्या कंपनीच्या माध्यमातून नॅशनल हेराल्डची प्रकाशक कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल)ची संपत्ती विश्वासघात आणि फसवणूक करून ताब्यात घेतली. ईडीच्या आरोपांमध्येही या मालमत्तांच्या संपादनाशी संबंधित गैरव्यवहार आणि फसवणुकीचे दावे करण्यात आले आहेत. या कंपनीच्या मालमत्तांमध्ये दिल्ली, मुंबई व लखनऊमधील प्रमुख मालमत्तांचा समावेश आहे जी किंमत साधारण ५००० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मुख्य म्हणजे दिल्लीच्या मध्यभागी असलेल्या बहादूर शाह जफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊसचा देखील यात समावेश आहे. या प्रकरणात ईडीने आरोप पत्र दाखल केले आहे, गेल्या काही वर्षांत ईडीने आपली चौकशी तीव्र केली आहे. २०२३ मध्ये ईडीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियनशी संबंधित ७५२ कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. ११ एप्रिल २०२५ रोजी ईडीने ६६१ कोटींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता त्यांनी मनी लाँडरिंग आरोपपत्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावांचा समावेश केला आहे. त्यांच्यावर फसव्या मार्गाने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडून यंग इंडियनला मालमत्ता हस्तांतरित केली आहे.
यावेळी युवा मोर्चा नाशिक शहर सरचिटणीस प्रशांत वाघ, प्रवीण भाटे, हर्षद जाधव, संदीप शिरोळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य यश बलकवडे, शहर उपाध्यक्ष पवन उगले, प्रवीण पाटील, गौरव घोलप, शहरातील मंडळ अध्यक्ष गौरव बोड़के, अक्षय गांगुर्डे, अविनाश पिंपरकर, उमेश मोहिते, अमित चव्हाण, बाळकृष्ण शिरसाठ, विकास एखंडे, मुफ्फदल पेंटर, आदित्य सोनवणे, श्रीराज कान्नव, रोशन ठोके, शुभम काळे, भूषण शहाणे, सचिन निकम, महेश कुलकर्णी, आकाश मोरे, प्रतीक कमोद, कुलदीप, नितीन पाटील यांच्या सह भाजपा युवा मोर्चा नाशिक महानगरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अनेक दिवसापासून हे प्रकरण पाहत आहोत. या नॅशनल हेराल्ड प्रमाणात साधारण ५००० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे तसेच मोठ्या प्राणात मालमत्तेचे हस्तांतरण करून जनतेचे पैसे लाटण्याचे काम या घोटाळ्यामध्ये केले आहे. काँग्रेसचे नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे प्रकरण कायदेशीर दोषी आढळले आहे त्यामुळे सरकार आणि न्यायव्यवस्थेने या आरोपी काँग्रेस नेत्याना त्वरीत कारवाई करून अटक करावी.
सागर शेलार, शहराध्यक्ष, भाजप युवा मोर्चा











