कुंभमेळ्यासाठी तयारीला येणार गती

नाशिक | नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या २०२६-२७ सालच्या सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाला राज्याच्या विधीमंडळाची अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून, त्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध कामांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमध्ये प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून, राज्य मंत्रिमंडळाने याला ४ जून रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली होती. त्यानंतर एक अध्यादेश काढण्यात आला होता आणि आता विधीमंडळाच्या मंजुरीनंतर प्राधिकरण विधिसंमत झाले आहे.

प्राधिकरणाची रचना व जबाबदाऱ्या
प्राधिकरणात एकूण २२ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नाशिकचे विभागीय आयुक्त अध्यक्ष, तर जिल्हाधिकारी व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक उपाध्यक्ष आहेत. याशिवाय, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्र्यंबकेश्वरचे मुख्य अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, ‘कुंभमेळा आयुक्त’ हे नवे पद निर्माण करण्यात आले आहे.

प्राधिकरण स्थापनेनंतर विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी पहिली बैठक घेतली होती आणि कार्यात सुसूत्रता राखण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता विधीमंडळाच्या अंतिम मंजुरीनंतर सिंहस्थ कुंभमेळ्यासंबंधीचे निर्णय घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे प्राधिकरणाला अधिकृतपणे शक्य होणार आहे.

error: Content is protected !!