आश्रमशाळेत रानभाज्यांचा उत्सव

नाशिक | निसर्गाने बहाल केलेल्या पावसाळ्यातील पोषणमूल्यांनी भरलेल्या रानभाज्यांचा महोत्सव नाळेगाव, शिरसगाव आणि मुरंबी येथील आश्रमशाळांमध्ये साजरा करण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात पारंपरिक रानभाज्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आणि सर्वांनी एकत्र येऊन त्या भाज्यांचा आस्वाद घेतला.

रानभाज्या – आरोग्याची नैसर्गिक शिदोरी
या भागातील आदिवासी समाजाला वनस्पती आणि रानभाज्यांचे पारंपरिक ज्ञान आहे. हे ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे आणि नैसर्गिक, विषमुक्त अन्नाची कदर वाढावी, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनीही या उपक्रमात सहभाग घेत स्थानिक वनभाज्यांचे स्टॉल्स उभारले.

पदार्थांची चव आणि माहिती एकत्र
स्टॉलवर अंबाडी, तेरा, वास्ता, माठ, पेढरा, खुरसणी, तांदुळ भाजी, जिरे भाजी, कवदर, मोहठा, लोती, आक्रा, भोकोरले, आंळिब, कुळी, नागली, तांदूळ आणि बाजरीची भाकरी अशा विविध रानभाज्यांचे आणि पारंपरिक पदार्थांचे दर्शन व चव घेता आली. शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी एकत्रितपणे हा आनंद साजरा केला.

या कार्यक्रमात शिरसगावचे सरपंच भागिरथी महाले, सामाजिक कार्यकर्ते, मुख्याध्यापक दीपक भास्कर, शितल खंडे, तसेच शिक्षक सिद्धार्थ भोगले, दौलत लहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. वनस्पतींची ओळख, त्यांचे आरोग्यदायी फायदे आणि स्थानिक आहारातील महत्त्व यावर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

error: Content is protected !!