कुंभमेळा प्राधिकरण स्थापन : यांचा सामावेश, असे असतील अधिकार ?

नाशिक । नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळयाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी होत होती. त्यानूसार २२ अधिकार्‍यांचा सामावेश असलेले स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या संदर्भातला अध्यादेश जारी करण्यात आला असून विभागीय आयुक्त हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील तर जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक हे उपाध्यक्ष असतील.

नाशिक सिंहस्थ कुंभमेळयाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानूसार यंदा २२ महिन्यांचा पर्वकाळ असून यात ४२ अमृत स्नानाच्या तारखा आहेत. नुकत्या प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळयात कोटयावधी भाविकांनी हजेरी लावली. नाशिकमध्येही मोठया प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून कायमस्वरूपी कुंंभमेळा प्राधिकारण स्थापन करावे अशी मागणी होत होती.

मागील कुंभमेळयातच नाशिकसाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली होती मात्र प्राधिकारण स्थापन होऊ शकले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी नाशिक दौर्‍यावर येत कुंभमेळा प्राधिकरणाची घोषणा केली. तसेच मागील आठवडयात झालेल्या सिंहस्थ बैठकीत प्राधिकरणाचा अध्यादेश लवकरच जारी केला जाईल असे सांगितले.
त्यानूसार राज्यपालांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी करत अंतिम मान्यता दिली आहे.

आता प्राधिकरण स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या नाशिकसाठी नाशिक महापालिका आणि त्र्यंबकेश्वरसाठी जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत यंत्रणा कार्यरत आहे. परंतू आता प्राधिकरण झाल्याने कुंभमेळयाचे नियोजन एकाच छताखाली करता येणे शक्य होणार आहे. या प्राधिकरणावर नाशिकचे विभागीय आयुक्त पदसिध्द अध्यक्ष असून जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक हे उपाध्यक्ष असणार आहेत.

साधू महंतांना स्थान नाही
कुंभमेळा प्राधिकरणावर आखाडयाच्या प्रतिनिधींचा सामावेश असावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र प्राधिकरणाच्या मसुद्यात प्रशासकीय अधिकार्‍यांव्यतिरिक्त इतर कोणाचाही सहभाग करण्यात आलेला नाही असे दिसून येते. त्यामुळे साधू महंतामध्ये नाराजीचा सूर आहे. परंतू प्राधिकरणाची मागणी पूर्ण झाल्याबददल आखाडा परिषदेने समाधान व्यक्त केले. याप्रमाणेच आता साधुग्राम जागेचाही प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आखाडा परिषदेने केली आहे.

असे असेल प्राधिकरण
विभागीय आयुक्त (अध्यक्ष), जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक (उपाध्यक्ष), अहिल्यानगर जिल्हाधिकारी, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आयुक्त, (पदसिध्द सदस्य) नाशिक शहर पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण, नाशिक महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, नियोजन उपायुक्त, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ विभागीय नियंत्रक, आरोग्य उपसंचालक, अधिकक्ष अभियंता जलसंपदा गोदावरी नदी व जलव्यवस्थापन प्रभारी, बांधकाम विभाग मुख्य अभियंता, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अधिक्षक अभियंता वीज वितरण, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी, लेखा व कोषागारे सहसंचालक, रेल्वे मंडळाचे प्रतिनिधी , कुंभमेळा आयुक्त (सचिव)

असे असतील अधिकार व कार्य
कुंभमेळयाचे व्यवस्थापन
कुंभमेळा आराखडा तयार करणे
प्रस्तावित बांधकामांना प्रशासकीय मान्यता देणे.
निविदा प्रक्रिया राबवणे
कंत्राटदार नियुक्त करणे.
कंत्राटांच्या दायित्वांचे संनियंत्रण करणे
कुंभमेळयासाठी बांधलेल्या मालमत्तांच्या पुढील वापराबाबत निर्णय घेणे.
प्राधिकरणाचा अहवाल दर महिन्याला मंत्री समितीसमोर व शासनाला सादर करणे.

अध्यक्षांचे अधिकार व कार्य
आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेणे.
वाहतूक, परिवहन, गर्दी व्यवस्थापन नियोजन
कोणत्याही शासकीय, प्राधिकरणाच्या संसाधनांचा वापर करणे.
कर्मचारी वर्ग अधिग्रहीत करणे
तज्ञ सल्लागार व सल्लागार कंपन्यांची नियुक्ती करणे.
आवश्यक असतील अशा सेवा, संसाधने, जागा अधिग्रहीत करणे.
प्राधिकरण ठरवेल अशा जागांचे करार करणे
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणे
प्रकल्पाच्या टप्प्यानूसार निधी देणे किंवा अनुदान वितरीत करणे.
निविदेसाठी अटी, शर्थी ठरवणे.
प्रकल्पांचे गुणवत्ता नियंत्रण तपासणे.

error: Content is protected !!