Exclusive : धनंजय मुंडें आत्मशांतीच्या मार्गावर ; इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दाखल

नाशिक । सतत राजकीय व वैयक्तिक वादविवादांमुळे चर्चेत असलेले अजित पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आता मन:शांतीच्या शोधात इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत. मागील आठ दिवसांपासून ते या ध्यानसत्रात सहभागी असून दहा दिवसांच्या ‘मौन साधनेत’ गुंतले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

धनंजय मुंडे यांना अलीकडेच अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात त्यांच्यावर अप्रत्यक्ष गंभीर आरोप झाले होते. त्यांच्या जवळच्या सहकार्‍यांपैकी वाल्मीक कराड याला या प्रकरणात आरोपी करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, ४ मार्च २०२५ रोजी मुंडेंनी स्वतः ट्विट करत प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

त्यावर अजून एक धक्का म्हणजे करुणा मुंडे यांनी केलेले खळबळजनक आरोप. घरगुती हिंसाचार प्रकरणात वांद्रे न्यायालयाने मुंडे यांना दोषी ठरवत दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. या वैयक्तिक आणि सार्वजनिक संकटांनी घेरलेल्या धनंजय मुंडे यांच्यासाठी मंत्रिमंडळात पुनर्प्रवेशाची शक्यता कमी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

या सर्व घटनाक्रमांनंतर धनंजय मुंडे यांनी आत्मपरीक्षणासाठी आणि मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी इगतपुरीच्या सुप्रसिद्ध विपश्यना ध्यानकेंद्राचा मार्ग स्वीकारला आहे. या केंद्रात प्रवेश घेतल्यापासून ते कोणताही सार्वजनिक संपर्क न ठेवता, मौन आणि ध्यानधारणा करत आहेत.

राजकारण, वाद, आरोप-प्रत्यारोप यामधून काही काळ निवृत्त होऊन अंतर्मुख होण्याचा निर्णय मुंडेंनी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विपश्यना म्हणजे काय?
धम्मगिरी विपश्यना केंद्र हे महाराष्ट्रातील इगतपुरी येथे वसलेले एक प्रसिद्ध ध्यान साधना केंद्र आहे. हे केंद्र गौतम बुद्धांनी शिकविलेल्या विपश्यना ध्यान साधनेला समर्पित असून, संपूर्ण जगभरातील लोक येथे शांतता आणि आत्मशुद्धीसाठी येतात.

विपश्यना हे गौतम बुद्धांनी शिकवलेले एक प्राचीन ध्यान तंत्र आहे, जे मन, शरीर आणि आत्मशुद्धी यामध्ये संतुलन साधण्यास मदत करते. या ध्यान पद्धतीद्वारे, सांसारिक तणाव, दुःख आणि चिंता दूर होतात, तसेच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारते. धम्मगिरी केंद्रात १० दिवसांच्या विनामूल्य विपश्यना कोर्स घेतले जातात, ज्यामध्ये ध्यान, मौन, आणि अंतर्मन निरीक्षण शिकवले जाते.

error: Content is protected !!