Chhagan bhujbal : छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया

नाशिक । राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबई येथे खाजगी रूग्णालयात हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. तसेच मंत्रालयात पार पडलेल्या सर्व बैठकांमध्ये छगन भुजबळ उपस्थित होते.

गेल्याच आठवडयात मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीनंतर भुजबळ यांना थकवा जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छगन भुजबळ यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली होती. पण त्यानंतर सोमवारी भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रिये नंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला छगन भुजबळ यांना दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यात पुन्हा सक्रिय होणार आहेत, अशी माहिती भुजबळ यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!