Dhananjay munde: धनंजय मुंडे ‘या’ आजाराने त्रस्त

आजारपणाच्या अफवांनी धनंजय मुंडे व्यथित

बीड : जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह इतर आरोपींना अटक झाल्यानंतर मुंडेंवर राजकीय दबाव वाढू लागला. परिणामी, त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील संकटांनी त्यांना ग्रासले आहे.

करुणा मुंडे यांनी पोटगी प्रकरणी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्यायालयाने आधीचाच निर्णय कायम ठेवल्याने धनंजय मुंडेंना आणखी एक धक्का बसला. हे सर्व कमी होते की काय, अशा स्थितीत त्यांची तब्येतही बिघडली. यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आले.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या एका विधानानंतर काही माध्यमांनी “धनंजय मुंडेंना अर्धांगवायू झालाय” अशा बातम्या चालवायला सुरुवात केली. मात्र यावर स्वतः धनंजय मुंडेंनी x (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत स्पष्ट केले की, त्यांना अर्धांगवायू नव्हे, तर बेल्स पाल्सी झाल्याचे निदान झाले आहे.

धनंजय मुंडेंनी त्यांच्या x पोस्टमध्ये लिहिले –

“आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.” ते पुढे म्हणाले – “श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार. मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही.”

धनंजय मुंडेंच्या या स्पष्टतेनंतर त्यांच्या तब्येतीबाबत पसरवलेल्या अफवांना पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा आहे. सध्या ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असून, वैयक्तिक प्रकृतीची काळजी घेत आहेत.

error: Content is protected !!