नाशिक । मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार असून, मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर निर्णायक निर्णय घेण्यात येणार आहे. आज झालेल्या सुनावणीत आरोपींच्या मालमत्तेवर लावलेल्या सीलबाबत व त्याच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद करण्यात आला. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली. त्यांनी स्पष्ट केलं की, या दोन्ही अर्जांवर न्यायालय २२ जुलै रोजी निकाल देणार आहे.
या पार्श्वभूमीवर, बीडमधील तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला नाशिक कारागृहात हलवण्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. मात्र यावर सरकारी वकील उज्वल निकम यांनी स्पष्ट सांगितले की, असा कोणताही अर्ज अद्याप न्यायालयात दाखल झालेला नाही. तुरुंग प्रशासनच यावर अंतिम निर्णय घेईल.
वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितले की, आरोपीच्या नावावरील बँक खाती व प्रॉपर्टीवर लावलेले सील हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, संबंधित मालमत्ता आणि बँक खाती कोणत्याही गुन्ह्यातून मिळवलेली नाहीत व त्यांचा गुन्ह्याशी काहीही संबंध नाही.
या प्रकरणातील दोषमुक्तीचा अर्ज आणि प्रॉपर्टीवरील सीलबाबतचा निर्णय २२ जुलै रोजी देण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी न्यायालय काय निर्णय देते, हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.
वाल्मीक कराडला कुठल्या तुरुंगात ठेवणं हे अधिक सुरक्षित राहील, याबाबत मला माहिती नाही. हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे आणि तुरुंग प्रशासनच याबाबत निर्णय घेईल. न्यायालयात त्या संदर्भात अद्याप कुठलाही अर्ज आलेला नाही. तसेच याबाबत न्यायालयाने देखील आमच्याकडे विचारणा केलेली नाही. अशी माहिती देखील अॅड. उज्वल निकम यांनी दिली.
वाल्मिक कराड याचे बँक अकाउंट सील करण्याची कारवाई रद्द करावी, अशी मागणी आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आली होती. तसेच प्रॉपर्टी जप्तीसाठी केलेल्या अर्जावर देखील येत्या 22 जुलैला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे या सुनावणी वेळी कोर्ट नेमकं काय निर्णय देतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.











