सिंहस्थ कुंभमेळा : गर्दी नियोजनासाठी रेल्वेकडून ‘या’ पर्यायांचा अभ्यास

नाशिक । सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने येणार्‍या भाविकांच्या गर्दी नियोजनासाठी आराखडा तयार केला आहे. सध्याची नाशिकरोड रेल्वे स्थानकाची प्रवासी क्षमता बघता सिंहस्थातील गर्दीचे नियोजन हाताळण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर असणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या व्यवस्थापक इति पांडे यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकाला भेट देत पाहणी केली. यावेळी गर्दी नियोजनासाठीच्या पर्यायांचा अभ्यास करत प्रशासनाला तशा सूचनाही केल्या.

या पाहणी दौर्‍या दरम्यान नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम,नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांच्यासह राज्य शासन आणि मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सिंहस्थ मेळ्यादरम्यान होणार्‍या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावित मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब (MMTH) यावर सादरीकरण करण्यात आले. हा प्रकल्प रेल्वे, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक यांचा समन्वय साधणारा असून, यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी तयार केला जात आहे. बैठकीनंतर नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि देवळाली स्थानकांची पाहणी करण्यात आली. विद्यमान सुविधांचे परीक्षण करण्यात आले.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर एकाचवेळी मोठया संख्येने भाविकांची गर्दी झाल्यास चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच एकाच वेळी गर्दी बाहेर पडल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊन वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण होऊ शकते. याचा विचार करता नवीन स्थानकांचा विकास प्रस्तावित आहे त्यामुळे गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल आणि भाविकांना देखील ते सोयीचे ठरेल. नाशिकरोड रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या मालधक्का येथे मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचे नियाजन आहे. याकरीता १२ एकर जमीन आवश्यक असून मालधक्क्याची जागा ताब्यात घेतल्यास त्या बदल्यात रेल्वेला पर्यायी जागा द्यावी लागणार आहे. या जागेचा शोधही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. या सर्व पर्यायांची पाहणी यावेळी करण्यात आली.

नाशिक रोड व देवळाली स्थानकांचा सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार होणार.
ओढा स्थानकावर विशेष गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म वाढविण्याचे नियोजन.
देवळाली स्थानकावर देखभाल सुविधांसाठी नवीन लाईन्स उभारल्या जाणार.
नाशिक डेपो येथे प्रवाशांसाठी विशेष टर्मिनल व थांबा सुविधा निर्माण.
खेरवाडी स्थानकाचे भूसंपादनासह पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रस्तावित.

error: Content is protected !!