मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे नुकत्याच पार पडलेल्या मध्य रेल्वेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिकच्या प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला. नाशिकवर होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही, अशा ठाम शब्दांत त्यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली .
या बैठकीत नवीन रेल्वे स्थानकांचा विकास, ट्रॅक्शन मशीन कारखान्याचा पुनरुज्जीवन, लॉजिस्टिक हब, महत्त्वाकांक्षी रेल्वेगाड्यांचे प्रस्ताव, पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेसच्या समस्या, आणि कामांचा निकृष्ट दर्जा या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. खा. वाजे यांनी नाशिक-कल्याण लोकल सेवा, मनमाड-इगतपुरी-कल्याण नवीन ट्रॅक, कसारा बोगद्याचे रुंदीकरण, तसेच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प यासारख्या दीर्घकालीन आणि मूलभूत प्रकल्पांची आवश्यकता अधोरेखित केली.
ट्रॅक्शन मशीन कारखान्याचा मुद्दा अग्रभागी
१९८१ पासून कार्यरत असलेल्या नाशिकच्या ट्रॅक्शन मशीन कारखान्याचा पूर्ण क्षमतेने वापर न झाल्याची बाब त्यांनी उचलून धरली. यावेळी त्यांनी काही उपाय सुचवले यात लोको शेड आणि मेमू डिपो उभारणी, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती युनिट, नवीन उत्पादन युनिट यामुळे स्थानिकांना रोजगार, औद्योगिक विकासाला चालना, आणि रेल्वेच्या तांत्रिक गरजांची पूर्तता होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ट्रॅक्शन कारखान्यातील कामगारांची पदोन्नती, रिक्त पदांची भरती, आणि प्रलंबित मागण्यांवर तोडगा यावर चर्चा करत त्यांनी रेल्वे बोर्डमार्फत आरआरबीहद्वारे पारदर्शक भरती प्रक्रियेची मागणी केली.
पंचवटी आणि राज्यराणीच्या वेळेचा मुद्दाही उपस्थित
पंचवटी एक्सप्रेस ही नाशिक-मुंबई दरम्यानची अत्यंत महत्त्वाची सेवा असूनही, तिच्या वेळापत्रकातील बदल, तांत्रिक बिघाड, आणि डब्यांचा खराब दर्जा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. राज्यराणी एक्सप्रेसला मूळ मार्गावर पुनर्संचलित करणे, तसेच नाशिक-मुंबईदरम्यान नवीन स्वतंत्र रेल्वेगाडी सुरु करण्याची ठाम मागणी त्यांनी केली.
कुंभमेळयासाठी सुचवले हे उपाय
नाशिक रोड स्थानकाचा विस्तार
ओढा येथे न्यू नाशिकरोड स्थानकाची उभारणी
पाडळी येथे लॉजिस्टिक व सुकाणू केंद्र
अंडरपास व ब्रिज
या नवीन रेल्वेगाड्यांचे प्रस्ताव
‘एकादशी एक्सप्रेस’ – नाशिकरोड ते पंढरपूर
नाशिक-अयोध्या, नाशिक-वाराणसी, नाशिक-तिरुपती दर्शन स्पेशल
नाशिक-कोकण/गोवा सेवा
नाशिक-जयपूर-कटरा मार्गे लष्करी गाडी
नाशिक-अजमेर/पुष्कर ’एकता एक्सप्रेस’
रेल्वे हे नाशिकच्या सर्वांगीण विकासाचे इंजिन आहे. त्यामुळे हे सर्व प्रकल्प केवळ मागण्या नसून, नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक पावले आहेत. मी संसदेमध्येही या सर्व मुद्द्यांवर सातत्याने पाठपुरावा करत राहीन आणि आता इथून पुढे रेल्वेकडून नाशिकवर होणारा अन्याय, गाड्या आणि प्रकल्पांची पळवापळवी सहन केली जाणार नाही
खासदार राजाभाऊ वाजे,नाशिक











