Nashik kumbh : उज्जैन पथकाचा नाशिक दौरा ; कुंभ नियोजनाचा होणार

नाशिक । आगामी नाशिक कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिकनंतर उज्जैन येथे कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे नाशिकच्या कुंभ नियोजनाचा अभ्यास करण्यासाठी तसेच उज्जैन कुंभमेळयातील अनुभवाचे आदान प्रदान करण्याच्या दृष्टीने उज्जैनचे कुंभ अधिकारी बुधवारी नाशिक दौरयावर येत आहेत. या दौरात नाशिक आणि त्रयंबकेश्वर येथे प्रत्यक्ष भेट देत पाहणी करण्यात येणार आहे.

या पथकात उज्जैन कुंभमेळा प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, कुंभमेळा प्राधिकरणाचे समन्वय अधिकारी तसेच शहरी नियोजन आणि पायाभूत सुविधा विभागातील तज्ज्ञांचा समावेश आहे. नाशिक कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कुंभ आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे साडेपाच हजार कोटी रूपयांच्या विकास कामांना मंजूरी देण्यात आली.

कुंभ विकास आराखडयानूसार नाशिक येथे नविन घाटांचा विकास, साधुग्राम, टेंट सिटी, रामकाल पथ, त्रयंबकेश्वर येथे दर्शन पथ, कुशावर्त तीर्थाला पर्यायी घाटांची नर्मिती, नाशिक शहरात रस्ते, नवीन पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. उज्जैन आणि नाशिक कुंभ यात भौगोलिक दृष्टया मोठी तफावत आहे. परंतू प्रशासनाने यापूर्वीच्या कुंभमेळयात कमी जागेत उत्कृष्ठ नियोजन केले आहे.

यंदा प्रयागच्या धर्तीवर कुंभमेळयाचे नियोजन करण्यात येत आहे. नाशिकनंतर साधारपणे आठ महिन्यांत उज्जैनचा कुंभमेळा होणार आहे. उज्जैन येथे कुंभमेळयाच्या अनुषंगाने विकासकामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, तरीही नाशिक प्रशासनाने केलेले कुंभ नियोजन, तसेच उज्जैन कुंभमेळयात करण्यात येणारया नियोजनाच्या दृष्टीने बुधवारचा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. कुंभमेळा प्राधिकरणाकडून आधीच प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असून, उज्जैनच्या पथकास हा आराखडा सादर करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर गोदावरी घाट परिसर, त्र्यंबकेश्वर मार्ग, तसेच तात्पुरत्या वसाहतींच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी होणार आहे. दोन्ही राज्यांच्या तज्ज्ञांकडून कुंभ नियोजनाच्या दृष्टीने विचारांचे आदान प्रदान होणार असून या चर्चेतून चांगल्या उपाययोजनांचा अंर्तभाव कुंभ नियोजनात करणे सोयीचे होणार आहे. यावेळी उज्जैन पथकासोबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त तसेच कुंभमेळा अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पाहणीनंतर संयुक्त बैठक घेऊन पुढील टप्प्यातील आराखड्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीद्वारे नाशिक कुंभमेळ्याची तयारी अधिक सुसूत्र, शाश्वत आणि जागतिक दर्जाची करण्याचे उद्दिष्ट आहे.

error: Content is protected !!