नवी दिल्ली । आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच आयपीएलचे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोष सुरू झाला. मात्र, या आनंदमय क्षणात एक दुर्दैवी घटना घडली. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत ११ निरपराध चाहत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, बीसीसीआयने याची गंभीर दखल घेतली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत म्हटले की, ही घटना आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा आहे. दरवर्षी एक संघ जिंकतो आणि त्यांच्या शहरात सेलिब्रेशन होते. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलायला हवीत.
विजयी मिरवणुकांवर नियंत्रणासाठी नवा आराखडा
सध्या कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीच्या विजयी मिरवणुकीवर बीसीसीआयचे थेट नियंत्रण नसते. मात्र, या घटनेनंतर बोर्डने मोठा निर्णय घेतला असून, लवकरच विजयी मिरवणुकांबाबत नवे नियम जाहीर करण्यात येणार आहेत. या नव्या नियमावलीनुसार, प्रत्येक विजयी संघाला रॅली कधी, कुठे व कशा स्वरूपात घेता येईल यासंदर्भात बीसीसीआयची परवानगी घेणे बंधनकारक होणार आहे. या नियोजनामध्ये राज्य शासन व स्थानिक प्रशासनाची भूमिका देखील महत्त्वाची असेल, जेणेकरून उत्सव सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने पार पाडता येईल.
पूर्वीही झाला होता गर्दीचा अनुभव
गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या विजयानंतर कोलकातामध्ये मोठ्या प्रमाणावर विजय रॅली आयोजित करण्यात आली होती. 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर चेन्नई आणि अहमदाबादमध्येही हजारो चाहत्यांची गर्दी झाली होती. अशा गर्दींमुळे वाहतूक कोंडी, सुरक्षा यंत्रणांवर ताण आणि लोकजीवन विस्कळीत होण्याचे प्रकार घडत होते. मात्र, यंदा आरसीबीच्या विजयानंतर घडलेल्या दुर्घटनेमुळे आता या गोष्टींकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.









