मुंबई । भारतीय फिरकीपटू अमित मिश्रा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच सर्व प्रकारच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा सोशल मीडियावर केली. तब्बल २५ वर्षांच्या क्रिकेट प्रवासाला पूर्णविराम देताना मिश्रा यांनी चाहत्यांसह प्रशिक्षक, संघसाथीदार आणि कुटुंबीयांचे आभार मानले.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
कसोटी सामने: 22
एकदिवसीय सामने (ODI): 36
टी-20 सामने: 10
विकेट्स: कसोटी – 76,
एकदिवसीय – 64,
टी-20 – 16
अशी राहीली कारकिर्द
मिश्राने 2003 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली येथे कसोटी पदार्पण करताच पाच विकेट्स घेतल्या.
2013 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत 18 विकेट्स घेऊन जवागल श्रीनाथच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. 2014 मध्ये बांगलादेशमधील टी-20 विश्वचषकातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
आयपीएल प्रवास
अमित मिश्राने 2017 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसले तरी देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळत राहिले. आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांनी आपला शेवटचा सामना खेळला.
निवृत्ती जाहीर करताना मिश्रा म्हणाले की, क्रिकेट हे त्यांचे पहिले प्रेम असून या खेळाने त्यांना सर्व काही दिले आहे. या प्रवासात चाहत्यांचा विश्वास, कुटुंबीयांचा आधार आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. आता या खेळाला परतफेड करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या आठवड्यात तीन मोठ्या निवृत्ती
27 ऑगस्ट 2025 – आर. अश्विन यांनी आयपीएलमधून निवृत्ती घेतली
2 सप्टेंबर 2025 – पाकिस्तानचा आसिफ अलीने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली
4 सप्टेंबर 2025 – अमित मिश्रा यांनी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली










