दिंडोरी अपघातानंतर खासदार भगरे यांचा गंभीर आरोप

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एका अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात घडला. मोटारसायकल आणि अल्टो कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाल्याने कार रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळली. या अपघातानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी मोठा आरोप केला असून यासंदर्भात बांधकाम विभागावरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी भगरे यांनी केली आहे

या धडकेमुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट नाल्यात उलटली. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. पाण्याने भरलेल्या कारमध्ये अडकलेल्या सातही प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, सर्व मृत नाशिकमध्ये आपल्या नातेवाइकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते. परतीच्या वाटेत ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृतांच्या कुटुंबियांसाठी हा फार मोठा आघात आहे.

स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

या अपघातावर प्रतिक्रिया देताना दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी बांधकाम विभागावर गंभीर आरोप केला आहे. “बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाला,” असा ठपका त्यांनी ठेवला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भगरेंनी स्पष्ट केलं की, “या परिसरात वारंवार अपघात होत असूनही रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्ता चौपदरीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. हा मुद्दा आगामी पावसाळी अधिवेशनात पुन्हा मांडणार,” असेही त्यांनी जाहीर केले.

अपघातातील मृतांची नावे:
देविदास पंडित गांगुर्डे (वय 28)

मनीषा देविदास गांगुर्डे (वय 23)

भावेश देविदास गांगुर्डे (वय 2) – तिघेही सारसाळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील रहिवासी

उत्तम एकनाथ जाधव (वय 42)

अल्का उत्तम जाधव (वय 38) – कोशिंबे, ता. दिंडोरी येथील

दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय 45)

अनुसया दत्तात्रेय वाघमारे (वय 40) – देवपूर, देवठाण, ता. दिंडोरी येथील

अपघातातील जखमी:
मंगेश यशवंत कुरघडे (वय 25)

अजय जगन्नाथ गोंद (वय 18) – मूळगाव: नडगे गोट, ता. जव्हार, जि. पालघर; सध्या वास्तव्यास: भोला पिंपळगाव, सातपूर

error: Content is protected !!