नाशिक । गोदावरीला आलेल्या पूरामुळे गोदाकाठावरील रामसेतू पुलाला तडे गेले असून गोदावरी पुराचे साक्षीदार असलेला रामसेतू पुल अखेरच्या घटका मोजत आहे. गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे रामसेतू पुलावरून पाणी गेल्याने पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. तुर्तास हा पुल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. १९५५ साली बांधण्यात आलेल्या या रामसेतू पुलाचा इतिहास जाणून घेवूया..
गेल्या दोन दिवसांपासून गोदामाई दुथडी भरून वाहते आहे. गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदाकाठची लहान मंदिरे तसेच पुलही पाण्याखाली गेले. यात रामसेतू पुलावरूनही पाणी वाहत असल्याचे दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांचा हक्काचा पूल असलेला रामसेतूने अनेक पूर पाहिले. सुमारे १९५५ च्या सुमारास या पुलाची निर्मिती झाली. याच रामसेतूने १९६९,२००८,२०१६ आणि २०१९ मध्ये आलेले महापुर आपल्या अंगावरून पेलले. २०१९ मध्ये आलेल्या महापूरांचे धक्के या पुलाने पचवले आहेत.
६७ वर्षांपासून नाशिककरांना रामसेतूने साथ दिली. रामसेतूसह गाडगे महाराज पुलाचे काम अवघ्या १ लाख १० हजार रूपयांमध्ये झाले असल्याचे सांगितले जाते. मात्र सद्यस्थितीत रामसेतू पुल रामभरोसे असल्याचे दिसून आले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर रामसेतू पुल पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र प्रथम स्ट्रक्चर ऑडीट करून दुरूस्ती करायची कि, पूल पाडून नव्याने बांधकाम करायचे याबाबत निर्णय होत नसल्याने या पुलाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
रविवारी गोदावरीला आलेल्या पुराने रामसेतू पुलाला मोठया प्रमाणात तडे गेले आहेत. पुलाचे सरंक्षक रेलिंगही वाहून गेले असून काही गज हे वाकले गेले आहेत. पुलाला तडे गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सध्या तरी हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रामसेतू पुलाला तडे गेले आहेत मी देखील पुलाची पाहणी केली. आगामी सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर रामसेतू पुल पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे.
गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री









