कुंभमेळा बैठकीसाठी जय्यत तयारी, पण कामांना गती येणार का?

नाशिक । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. १ जून) होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. बैठकीला तेराही आखाड्यांचे प्रमुख साधु-महंत उपस्थित राहणार असल्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता आणि दुरुस्ती कामांचा धडका सुरू आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हेरिटेज इमातीला वैभव प्राप्त होणार आहे, मात्र कुंभमेळा कामांना गती मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

‘साधु-महंत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा’ ही म्हण जिल्हाधिकारी कार्यालयात अक्षरशः अनुभवता येत आहे. शुक्रवारपासून (ता. ३० मे) कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे.

बंद पडलेले दिवे बदलणे, इमारतीतील विद्युत तारांची दुरुस्ती, कोपर्‍यातील जाळी-जळमट हटवणे अशी विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

हेरिटेज वास्तूला नवे वैभव
जिल्हाधिकारी कार्यालय ही ऐतिहासिक वास्तू असल्याने तिचे सौंदर्य खुलवण्यासाठीही ही संधी साधली जात आहे. मुख्यमंत्री आणि साधु-महंतांच्या स्वागतासाठी इमारतीला पुर्नवैभव प्राप्त करून देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून होत आहेत.

सुरक्षेच्या उपाययोजना आणि स्वच्छतेला प्राधान्य
मुख्यमंत्र्यांचा दौरा लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. बैठकीदरम्यान कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी अधिकारी-कर्मचारी दिवसरात्र कामाला लागले आहेत. जनसामान्यांनीही कार्यालयातील बदललेल्या रूपाचे कौतुक केले आहे.

प्रत्येक आखाड्यासाठी एक विशेष वाहन
या बैठकीसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील तेरा आखाड्यांचे प्रमुख साधु-महंत प्रत्येकी दोन पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सुलभ प्रवासासाठी प्रशासनाने प्रत्येक आखाड्यासाठी एक स्वतंत्र वाहन तैनात केले आहे. त्यामुळे साधु-महंतांचा प्रवास सुसह्य व वेळेत पार पडेल, अशी खात्री आहे.

error: Content is protected !!