नाशिक । ग्रामीण भागातील स्टार्टअप्स आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने लवकरच नवीन इनोव्हेशन पॉलिसी लागू केली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबत अधिक बोलणे उचित होणार नाही परंतू, या माध्यमातून ग्रामीण भागात संशोधनाला चालणार मिळणार असल्याचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
निमा येथे ‘इंडस्ट्रीयल मिट’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोढा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सहा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्यात डिफेन्स व कृषी व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच राज्यभरातील ५० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) इमारतींचे नूतनीकरण सुरु असून पुढील पाच वर्षांत आयटीआय चे चित्र पूर्णतः बदललेले दिसेल, असा विश्वासही लोढा यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन मानधन देण्याऐवजी नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या (मविप्र) कर्मचार्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्य सरकारने याची दखल घेतली आहे. या प्रकरणी मविप्र संस्थेकडून संपूर्ण रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोढा म्हणाले, या प्रकरणी विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संस्थेवर कारवाई करण्यात येईल. सद्यस्थितीत अनुदानाची संपूर्ण रक्कम परत घेण्यात आली असून यापुढील निर्णय विभागीय अहवालावर आधारित असेल.











