भाजप विरुद्ध राष्ट्रवादी नवा संघर्ष नाशिक बाजार समिती चौकशीचे आदेश

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. बाजार समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी भाजपप्रणीत संचालक मंडळावर गंभीर आरोप करत ते बरखास्त करण्याची आणि प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे.

पिंगळे यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांना लिहिलेल्या पत्रामध्ये बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या पत्राची दखल घेत पणन मंत्री रावल यांनी जिल्हा उपनिबंधकांना तीन आठवड्यांत चौकशीचे आदेश दिले आहेत.

उत्पन्नात ४० लाखांची घट
देविदास पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी एप्रिल महिन्यात नाशिक बाजार समितीचे उत्पन्न ₹२.३० कोटी होते. मात्र, यंदा केवळ ₹१.९० कोटी उत्पन्न झाले असून तब्बल ₹४० लाख रुपयांची घट झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही घट गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे संकेत देणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राजकीय संघर्ष पुन्हा शिगेला
मार्च महिन्यात देविदास पिंगळे यांच्यावर भाजपकडून अविश्वास ठराव आणून त्यांची सत्ता उलथवून भाजपच्या कल्पना चुंभळे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर बाजार समितीत भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

चौकशीच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष
पिंगळे यांच्या आरोपांनंतर सुरू होणारी चौकशी आणि त्यातून समोर येणाऱ्या निष्कर्षांवर आता पुढील कारवाई अवलंबून आहे. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!