सिंहस्थ कुंभमेळा कामांसंदर्भात महाजनांनी दिले ‘हे’ निर्देश

नाशिक । नाशिकमध्ये होणारया सिंहस्थ कुंंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कुुंभमेळा कामांचा आढावा घेतला. कुंभमेळयासाठी निधीची कमी पडणार नाही. निधीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून आचा आराखडा अंतिम झाल्यानंतर त्याबाबत केंद्राशी चर्चा करू असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. कुंभमेळयाच्या अनुषंगाने शहराच्या विकासात भर पडणार असून आराखडयात प्रस्तावित कामांना गती देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. मे अखेर सर्व कामांची निविदा प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश महाजन यांनी यावेळी यंत्रणांना दिले.


यावेळी बोलतांना महाजन म्हणाले, कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित कामांचा आज सविस्तर आढावा घेण्यात आला. गेल्याच आठवडयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेत महत्वाचे निर्देश दिलेले आहेत. त्या कामांबाबत मी आजच्या बैठकीत आढावा घेतला. कुंभमेळयात शहरातून रिंगरोड तयार करण्यात येणार आहे. नुकताच प्रयागराज येथे कुंभमेळा झाला. करोडोच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये आल्याचे आपण पाहिले. नाशिकमध्ये देखील यंदा दुप्पट, तिप्पट गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने भाविकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहे. याकरीता रस्त्यांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी एमएमआरडीच्या माध्यमातून शहरातून रिंगरोड तयार करण्यात येणार आहे. यामुळे नाशिक शहराची कनेक्टिव्हीटी वाढण्यास मदत होणार आहे.


त्याचप्रमाणे शहरात ११ नवीन पुल बांधण्यात येणार आहे.यातील दोन पुलांना महापालिकेने मंजूरी देत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. उर्वरित ९ पुलांसाठीही लवकरच मान्यता देऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निधी नाही म्हणून काम थांबले असे म्हणणे चुकीचे आहे. कुंभमेळयासाठी वेगवेगळया सरकारी यंत्रणा काम करत आहेत. त्यामुळे निधीची कुठेही कमतरता राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याबाबत आश्वासन दिले आहे. केंद्रही निधी देईल. अजून आमचा आराखडाच अंतिम झाला नाही, तो झाला की केंद्राकडेही निधीसाठी पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे निधी अभावी कोणतेही काम थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


कुंभमेळयासाठी कालावधी कमी राहीला आहे. त्यामुळे आता वेळेत कामे होण्यासाठी कामांना सुरूवात होणे गरजेचे आहे याकरीता मे अखेरपर्यंत मंजूर कामांच्या निविदा प्रक्रिया पुर्ण करण्याबाबत निर्देश बैठकीत देण्यात आले आहे. जलसंपदा खाते माझ्याकडेच आहे त्यामुळे आमच्या खात्यामार्फतही लवकरच कामांना सुरूवात करण्यात येईल. निओ मेट्रोबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना शब्द दिला आहे त्यामुळे निश्चित नाशिकमध्ये निओ मेट्रोचा प्रकल्प येईल याबाबत त्यांनी आश्वस्त केले.

error: Content is protected !!