नाशिकमध्ये पोलीसांचा दबदबा कमी ; भुजबळांची नाराजी

नाशिक: माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये विविध मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट भूमिका मांडली. संजय राऊत यांच्या नव्या पुस्तकावर, नाशिकमधील कायदा-सुव्यवस्था, वसंत व्याख्यानमाला, तिरंगा रॅली आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावर त्यांनी मत व्यक्त केलं.

संजय राऊत यांच्या पुस्तकावर भाष्य
छगन भुजबळ म्हणाले की, “मी अजून संजय राऊत यांचं पुस्तक वाचलेलं नाही. ते अजून माझ्याकडे आलं नाही.” नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यापूर्वीच्या काळात मी शिवसेना सोडली असल्याने त्या काळातल्या मदतीबाबत अधिकृत माहिती आपल्याकडे नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मदत झाली असेल, पण माझ्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही, असं त्यांनी नमूद केलं. तसेच, या विषयावर शरद पवार अधिक बोलू शकतात, तर बाळासाहेब ठाकरे आपल्यात नसल्याचं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना फेटाळलं
मला असं काही वाटत नाही की राष्ट्रवादीतील गट एकत्र येणार आहेत. अजित दादांनीही हे स्पष्ट केलं आहे की अशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असं भुजबळ यांनी सांगितलं.

कायदा सुव्यवस्थेवर चिंता
नाशिकमधील कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना त्यांनी चिंता व्यक्त केली. पूर्वी काहीही झालं तरी लगेच चर्चा होत असे, पण आता खुलेआम हत्या होत आहेत. पोलिसांचा दबदबा कमी झाला आहे. पोलिसांनी कडक भूमिका घेतली पाहिजे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

तिरंगा रॅलीव्दारे सैनिकांचा सन्मान
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी एकत्र, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या लढण्याचं सांगितलं. कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक लढण्याची उत्सुकता आहे असे ते म्हणाले. मुंबईत तिरंगा रॅली झाली. हे आपल्या सैन्याच्या पराक्रमाचे स्मरण आहे. सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य झालं, ज्यांनी हे वक्तव्य केले त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असती तर चांगला संदेश गेला असता. त्या मुस्लिम असूनही पाकिस्तानविरुद्ध लढायला तयार आहेत, हा चांगला संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

धरणं जुनी झाली आहेत, पाण्याचा वापर वाढलाय. नवीन धरणांना मान्यता मिळाली आहे. गंगापूर धरणातील गाळ काढण्यासाठीही मोठा खर्च आहे. आपण सर्वांनी पाण्याचा वापर जपून करायला हवा असे आवाहन त्यांनी केले. अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना वेळेवर मदत मिळाली पाहिजे. अन्यथा त्यांचं आर्थिक नियोजन कोलमडतं असे ते म्हणाले.

error: Content is protected !!