नाशिक । राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी नाशिक दौर्यादरम्यान पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा अग्रस्थानी आणला आहे. ते म्हणाले की, नाशिक हे ज्वलंत हिंदुत्वाचे केंद्र आहे. कुंभमेळा हा हिंदूंचा महाकुंभ असून, तिथे फक्त हिंदू व्यावसायिकांचीच दुकाने लागली पाहिजेत. मुस्लिम व्यापार्यांची दुकाने महाकुंभ परिसरात नसावीत, ही माझी ठाम मागणी आहे.
राणे म्हणाले, आम्ही त्यांच्या देवस्थानांवर विक्रीसाठी जात नाही, मग आमच्या धार्मिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती का असावी? हिंदू समाजाने सतर्क राहून कुंभमेळ्यात हिंदूंचीच दुकाने लागतील, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मोदींच्या योजना चालतात का ?
आमच्या देशात राहायचे अन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान न मानता शरियत कायदा चालवायचा विचार असेल, तर अशांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मालेगावमध्ये उर्दू शाळांनी ‘वंदे मातरम’ गाण्याचा आदेश नाकारल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, अशा लोकांना आपल्या राष्ट्रात ठेवायचे की नाही, हाच खरा प्रश्न आहे. आमच्या देशात राहून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घ्यायचा, पण मतदानाच्या वेळी इस्लाम आठवतो – हा दुटप्पीपणा थांबला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. आमचा कायदा न मानणार्यांना मोदींच्या योजना चालतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
इंदुरीकर महाराजांवरील टीकेवर प्रत्युत्तर
किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या शाही विवाहसोहळ्यावरून सुरू असलेल्या टिकेवर बोलताना राणे म्हणाले, हिंदू समाजावर जास्त टीका करू नका. मोठमोठे शाही विवाह सोहळे होतात, त्याकडेही लक्ष द्या. हिंदू पूजा आणि देवी-देवतांवर टीका करण्याची सवय सोडा, असा सल्ला त्यांनी दिला.
ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
दुबार मतदार आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले,
लोकसभेनंतर एकाच व्यक्तीने १४ वेळा बुरखा घालून मतदान केले, त्यावर यांनी आक्षेप घेतला नाही. मग फक्त हिंदूंनाच का टार्गेट केले जाते? मतदान केंद्रावर हिजाब घालून आलेल्या महिला या महिलाच असतात का, असा प्रश्न कधी विचारण्याची हिंमत दाखवाल? ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवता ना, मग कधी मोहम्मद अली रोडवर किंवा मालेगावमध्ये जाऊन हे प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान त्यांनी ठाकरे बंधूंना दिले.
राऊतांना शुभेच्छा
शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत प्रकृती अस्वस्थतेमुळे सध्या सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, राऊत लवकर बरे व्हावेत, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असते. आमची आणि त्यांची जुगलबंदी महाराष्ट्र एन्जॉय करत असतो. ते पुन्हा एकदा भांडूपच्या देवानंदसारखे सकाळी टीव्हीसमोर दिसावेत, अशी शुभेच्छा त्यांनी दिली.









