रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या महिलांचा राष्ट्रीय सन्मान

नवी दिल्ली । समाजजागृती, युवतींचा सर्वांगीण विकास आणि महिलांना धार्मिक क्षेत्रात मानाचे स्थान मिळावे यासाठी कार्यरत असलेल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे समितीच्या महिला कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी बोलताना रहाटकर यांनी नमूद केले की, ही देशातील पहिली आरती आहे, जिने महिलांना धार्मिक कार्यक्रमांमध्ये अग्रस्थानी स्थान दिले आहे. हा उपक्रम संपूर्ण देशाला एक नवा विचार देणारा ठरेल आणि महिलांना धार्मिक नेतृत्वातही संधी मिळेल.

समितीच्या विश्वस्त कविता देवी यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी समितीच्या अन्य मान्यवर महिला कार्यकर्त्यांमध्ये डॉ. अंजली वेखंडे, अशिमा केला, शोभा फड, विणा गायधनी, स्वाती संचेती, प्रेरणा बेळे, बोंदार्डे, किर्ती खोचे, सहाना माताजी यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. तसेच आरती उपक्रमाच्या पहिल्या बॅचपासून कार्यरत असलेल्या युवती – धनश्री पाटे, वेदिका अंभोरे, सायली पाठक, हर्षदा बोडके, इशिता आणि गीताश्री यांचाही गौरव करण्यात आला.

समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी व सर्व विश्वस्त, कार्यकर्त्यांनी महिलांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. यावेळी शैलेश देवी आणि मुकुंद खोचे यांनी सांगितले की, हा सन्मान केवळ समितीसाठी नाही, तर धार्मिक क्षेत्रात महिलांना मिळालेल्या मान्यतेचे प्रतीक आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गेल्या काही वर्षांत युवतींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, संस्कार संवर्धनासाठी आणि सामाजिक जागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये महिला आरती उपक्रम हे विशेष क्रांतिकारी पाऊल ठरले असून, या उपक्रमास मिळालेला राष्ट्रीय सन्मान ही समितीसाठी आणि संपूर्ण समाजासाठी गौरवाची बाब ठरली आहे.

error: Content is protected !!