मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवून ती वेळेत लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आज रस्ते प्रकल्पांच्या आढावा बैठकीत दिले.
मुंबई – नाशिक महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती देणे, मॉन्सूनपूर्वी ज्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार नाही त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतूक करण्यास योग्य बनविणे याबाबतच्या सूचनाही यावेळी दिल्या. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कामे रखडविणाऱ्या कंत्राटदारांना नोटिसा बजावाव्या, असे स्पष्ट निर्देशही याप्रसंगी दिले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक, कोकणातील कोस्टल महामार्ग, एक्सेस कंट्रोल महामार्ग, निवारा केंद्राची उभारणी, शक्तीपीठ महामार्ग, पुणे रिंग रोड, जालना-नांदेड समृद्धी कनेक्टर, गोंदिया-भंडारा-गडचिरोली समृद्धी एक्स्टेंशन, विरार-अलिबाग कॉरिडॉर, वाढवण-समृद्धी महामार्ग कनेक्टर, नवेगाव मोर-सुरजागड ग्रीनफिल्ड महामार्ग, नवीन महाबळेश्वर प्रकल्प, वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प यादेखील प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यातील कामांना गती द्यावी तसेच त्यात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश दिले.
एमएसआरडीसीला शासनाने अनेक प्रकल्प करायला दिले असून ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, तसेच सिडको, एमएमआरडीएप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी व्हावे असे सांगितले. एमएसआरडीसीची कामे ज्याठिकाणी सुरू आहेत तिथे राडारोडा दूर करून बेरिकेड्स बसवावेत. पुलाखाली उत्तम झाडे लावून सुशोभीकरण करावे तसेच पावसाळ्यापूर्वी करावयच्या कामांना प्राधान्य देऊन ती सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत असेही स्पष्ट केले.
यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.










